औरंगाबादेत परीक्षेच्या तोंडावर स्कूल बसवर ‘आरटीओ’ची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 15:56 IST2018-02-14T15:47:17+5:302018-02-14T15:56:21+5:30
वर्षभर अभय देऊन शालेय परीक्षा आणि उन्हाळ्याच्या तोंडावर आरटीओ कार्यालयाने तब्बल १०६ स्कूल बसचे परवाने निलंबित केले. तेही अवघ्या चार महिन्यांसाठी. यामुळे एकीकडे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे, तर दुसरीकडे आरटीओ कार्यालयाने एकप्रकारे जूनमध्ये या स्कूल बसेस पूर्ववत सुरू करण्याची संधी दिल्याची ओरड होत आहे.

औरंगाबादेत परीक्षेच्या तोंडावर स्कूल बसवर ‘आरटीओ’ची कारवाई
औरंगाबाद : वर्षभर अभय देऊन शालेय परीक्षा आणि उन्हाळ्याच्या तोंडावर आरटीओ कार्यालयाने तब्बल १०६ स्कूल बसचे परवाने निलंबित केले. तेही अवघ्या चार महिन्यांसाठी. यामुळे एकीकडे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे, तर दुसरीकडे आरटीओ कार्यालयाने एकप्रकारे जूनमध्ये या स्कूल बसेस पूर्ववत सुरू करण्याची संधी दिल्याची ओरड होत आहे.
गतवर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक क रणार्या स्कूल बसला ४ ते ३१ मेदरम्यान तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार स्कूल बसची तपासणी करून घेतली; परंतु अनेक स्कूल बस मालकांनी तपासणीकडे दुर्लक्ष केले. ही बाब आरटीओ कार्यालयाच्या निदर्शनास आली; परंतु याच वेळी कारवाई करण्याऐवजी कागदोपत्री सूचना देण्याची जुजबी प्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे स्कूल बसचालकांनी आरटीओ कार्यालयाकडे पाठ फिरवली. तब्बल सात महिने कारवाईकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा खास तपासणीपासून दूर राहिलेल्या स्कूल बसचालकांसाठी १७ डिसेंबर रोजी स्कूल बसची तपासणी मोहीम राबविण्यात आली; परंतु त्याकडे स्कूल बसचालकांनी ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे आरटीओ कार्यालय किमान आतातरी कारवाई करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती; परंतु त्यालाही विलंब झाला. कारवाईसाठी थेट नव्या वर्षात फेब्रुवारीचा मुहूर्त सापडला आणि १०६ स्कूल बसचे परवाने निलंबित झाले. या स्कूल बसेसचे चार महिन्यांसाठी परवाने निलंबित करण्यात आले. या कारवाईचा फटका फक्त विद्यार्थ्यांना बसत असल्याचे दिसते.
विद्यार्थ्यांची गैरसोय, स्कूल बसची काळजी
शालेय विद्यार्थ्यांच्या मार्च-एप्रिलमध्ये परीक्षा होतील. यावेळी स्कूल बसअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षेनंतर उन्हाळी सुट्या लागतील. सध्या परवाने निलंबित झालेल्या स्कूल बसमधून शाळेत ये-जा करणार्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे; परंतु स्कूल बसचालकांची काळजी घेण्यात आल्याचेच दिसते. या निलंबनाच्या कारवाईदरम्यान स्कूल बसची तपासणी करून त्रुटींची पूर्तता करावी लागणार आहे. ही एकप्रकारे संधीच देण्यात आली आहे.
निलंबन कालावधी कमी
चार महिन्यांनंतर म्हणजे उन्हाळी सुट्यांनंतर जूनमध्ये शाळा सुरू होतील. तेव्हा या स्कू ल बस नेहमीप्रमाणे चालविता येतील, अशी खबरदारी घेण्यात आल्याची चर्चा शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्यांमध्ये सुरू आहे. त्यासाठी परवाना निलंबिनाचा कालावधी कमी ठेवण्यात आला. चार महिन्यांऐवजी पाच ते सहा महिन्यांसाठी परवाने निलंबित झाले असते तर या स्कूल बसचालकांची अडचण झाली असती. याविषयी आरटीओ कार्यालयाच्या अधिकार्यांशी संपर्क साधला असता त्यांनी नियमानुसार ही कारवाई केल्याचे सांगितले.