घृष्णेश्वर मंदिराच्या आत सुधारणेसाठी ८० कोटी द्या; १५६ कोटींतून मंदिराबाहेरील परिसराचा विकास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 19:46 IST2025-08-26T19:45:26+5:302025-08-26T19:46:07+5:30
२०१८ मध्ये ११२ कोटींचा प्रस्ताव होता. २०२४ मध्ये तो १५६ कोटींवर गेला. २०२५ मध्ये ४५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

घृष्णेश्वर मंदिराच्या आत सुधारणेसाठी ८० कोटी द्या; १५६ कोटींतून मंदिराबाहेरील परिसराचा विकास
छत्रपती संभाजीनगर : वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची अंमलबजावणी सात वर्षांपासून सुरू आहे. घोषणांचा ‘अभिषेक’ करणाऱ्या आराखड्यातील कामांची पूर्तता सात वर्षांत झाली नाही.
वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिर परिसर विकासासाठी १५६ कोटी ६३ लाख रुपयांचा विकास आराखडा मंजूर असून मंदिराच्या आत सुधारणेसाठी ८० कोटींचा नवीन प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मंदिराच्या आतील परिसर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने त्यासाठी केंद्र व राज्य शासनाची संयुक्त परवानगी घेऊन आतील सभामंडपाचे काम केले जाणार आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने याबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.
कुंभमेळ्यापूर्वी १५६ कोटींच्या आराखड्याचे काम पूर्ण व्हावे, यासाठी १० ऑगस्ट रोजी उच्च तंत्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांनी सर्व यंत्रणांना ३१ मार्च २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.
ज्योतिर्लिंगाची झीज
ज्योतिर्लिंगाची झीज होत आहे. त्यामुळे मंदिर समितीने बाह्यदर्शनाचा ठराव घेऊन जिल्हा प्रशासनाकडे पाठविल्यास तेथे काय उपाययोजना करता येतील, याबाबत सर्वानुमते विचार केला जाईल, असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले. गाभाऱ्यात दर्शनाबाबत काही नियम आहेत. त्यामुळे भाविकांचीही तारांबळ उडते. त्यामुळे बाह्यदर्शन अथवा इतर काही व्यवस्था करण्याबाबत समितीने प्रस्ताव दिला तर प्रशासन विचार करेल, असे ते म्हणाले.
७ वर्षांत किती काम?
२०१८ मध्ये ११२ कोटींचा प्रस्ताव होता. २०२४ मध्ये तो १५६ कोटींवर गेला. २०२५ मध्ये ४५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. चार वर्षांत अतिक्रमणे काढण्याचे काम झाले. मागील दोन २ वर्षांत दगड, माती, चुन्यातील काम झाले आहे. भक्तनिवास, शॉपिंग कॉम्प्लेक्स, दर्शनबारी हॉल, बहुउद्देशीय सभागृहापैकी भक्तनिवासाचे काम ७० टक्के झाले आहे. शॉपिंग कॉम्प्लेक्सचे १० टक्के, दर्शनबारी व हॉलचे काम २० टक्के झाले असून शॉपिंग कॉम्प्लेक्सचे स्टाइल, डोमचे काम सुरू आहे.