रॉंगसाईड वाहनाच्या धडकेने दुचाकीचालक ठार; एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 20:21 IST2020-12-18T20:20:19+5:302020-12-18T20:21:29+5:30
बीड बायपासवर भीषण अपघात

रॉंगसाईड वाहनाच्या धडकेने दुचाकीचालक ठार; एक जखमी
औरंगाबाद: रॉंग साईड आलेल्या सुसाट छोटा हत्ती वाहनाने दुचाकीस्वारांना धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू झाला,तर दुचाकीवर मागे बसलेल्या मजूर गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात शुक्रवारी सायंकाळी बीड बायपास वर बाळापुर फाट्याजवळ घडला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी तरुणाला खाजगी रुग्णालयात दाखल केले. रवींद्र उमाकांत मोरे (२१, रा.शिवनगर गादिया विहार परिसर )असे मयताचे नाव आहे. राजू रघुनाथ जाधव (३२, रा. शिवनगर) असे जखमीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार राजू जाधव हे बांधकाम साईट वर सेंट्रींग प्लेट फिटिंग चे काम करतात. झाल्टा फाटा परिसरात त्यांचे काम सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी रवी आणि राजू मोटरसायकलवरुन बीड बायपास मार्गे कामाच्या ठिकाणी जात होते. देवळाई चौकाकडून ते बीड नाक्याच्या दिशेने जात असताना गुरुप्रसाद लॉन पासून काही अंतरावर रॉंग साईडने आलेल्या छोटा हत्ती वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकी चालक रवी रोडवर फेकला गेला आणि वाहनाच्या चाकाखाली आल्याने त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन तो ठार झाला. तर राजू रस्त्याजवळच्या नालीत फेकला गेल्याने गंभीर दुखापत होऊन जायबंदी झाला.
या अपघातानंतर त्यांना उडविणारा छोटा हत्ती वाहन चालक वाहनासह तिथून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच एम आय डी सी सिडको पोलीस ठाण्याचे ,पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि सिडको वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास देशमाने,उपनिरीक्षक कैलास पवार, हवालदार अमोल काकडे,विजय चव्हाण आणि घोरमाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्वप्रथम पोलिसांनी जखमी जाधवला देवळाई चौका जवळील खाजगीरुग्णालयात दाखल केले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह घाटीत हलविला.