सिल्लोड : सिल्लोड शहरातील आंबेडकर चौक येथे असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) एटीएममध्ये अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. यामुळे एटीएम मशिनला आग लागली. यात एटीएम मधील तब्बल एक लाख चौपन्न हजार दोनशे रुपयांची रोकड जळून खाक झाली. ही घटना रविवारी (दि. २२ सप्टेंबर) पहाटे ४ वाजता उघडकीस आली.
छत्रपती संभाजीनगर येथील एटीएम कंपनीत चॅनल एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत असलेल्या श्रीकांत एकनाथ पवार यांनी या प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, पहाटे साडेचारच्या सुमारास मुंबई येथील एसबीआय कंट्रोलरूमकडून सिल्लोड शहरातील एटीएममध्ये संशयास्पद हालचालीं होत असल्याचा इशारा आला. त्यांनी तात्काळ सिल्लोड शहर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शेषराव उदार, पोलीस उपनिरीक्षक डी. आर. कायंदे, पोलीस कर्मचारी राठोड, मोमीन व जाधव घटनास्थळी दाखल झाले. पण पोलीस येण्याच्या काही मिनिटांपूर्वीच चोरटे संशय आल्याने पसार झाले होते. पोलिसांनी व स्थानिक नागरिकांच्या मदतीने एटीएममधील लागलेली आग विझवली. तपासणीदरम्यान चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारल्याचे व गॅस कटरने मशिन कापल्याचे आढळले.
यानंतर कॅश लोडिंग स्टॉफच्या उपस्थितीत एटीएम मशीन तपासण्यात आले. मशिनमध्ये एकूण सात लाख चाळीस हजार दोनशे रुपये असल्याचे समोर आले. त्यापैकी एक लाख चौपन्न हजार दोनशे रुपये जळून नष्ट झाले तर उर्वरित पाच लाख शहाऐंशी हजार रुपये सुरक्षित मिळाले. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध सिल्लोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आधी एक एटीएम फोडले, नंतर सिल्लोडमध्ये आलेशहरातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारे चार चोरटे तोंडाला काळे रुमाल बांधलेल्या अवस्थेत सिल्लोड शहर पोलिसांनी शहरात बसवलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाले आहे. ते एका आलिशान काळ्या रंगाच्या कारमध्ये आले होते. त्यांनी सिल्लोडला येण्यापूर्वी चिखली येथे एक एटीएम फोडून १२ लाख रुपये चोरले असल्याची माहिती आहे. त्यानंतर जाफराबाद, भोकरदन मार्गे ते सिल्लोड ला आले होते.अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक डी.आर. कायंदे यांनी दिली.