साधूच्या वेशातील लुटारूंनी सोनसाखळी हिसकावत वृद्धाला कारसोबत १० फूट फरपटत नेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 18:34 IST2021-02-04T18:24:41+5:302021-02-04T18:34:37+5:30
crime news, chain snatching विजयश्री कॉलनीमधून ते जात असताना अनोळखी पांढऱ्या कारमधून आलेल्या चार जणांपैकी चालकाजवळ बसलेल्या साधूच्या वेशातील एकाने त्यांना आवाज देऊन पोलीस कमिश्नर यादव कुठे राहतात, असे हिंदीतून विचारले.

साधूच्या वेशातील लुटारूंनी सोनसाखळी हिसकावत वृद्धाला कारसोबत १० फूट फरपटत नेले
औरंगाबाद : एन-५ सिडको विजयश्री कॉलनीमध्ये सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या ६९ वर्षीय वृद्धाच्या गळ्यातील साडेचार तोळ्याची सोनसाखळी कारमधून आलेल्या तीन चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. सीपी यादव यांचा बंगला कुठे आहे, असे विचारत आरोपींनी त्यांच्याजवळ कार थांबविली. ते त्यांना पत्ता माहिती नाही, असे सांगत असताना कारमधील एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून घेतली. यामुळे ते सुमारे ३० सेकंद कारमागे फरपटत गेले.
केंद्रीय उत्पादन शुल्क विभागातून २०१२ साली निवृत्त झालेले विष्णू दौलत चित्ते (रा. बजरंग चौक परिसर, सिडको) सकाळी विजयश्री कॉलनीमधून जात असताना अनोळखी पांढरी कार त्यांच्याजवळ थांबली. त्यातील चार जणांपैकी चालकाजवळ बसलेल्या साधूच्या वेशातील एकाने त्यांना आवाज दिला. पोलीस कमिश्नर यादव कुठे राहतात, असे हिंदीतून विचारले. आपल्याला पत्ता माहिती नाही, असे चित्ते सांगू लागले. यावेळी त्याने आवाज ऐकायला येत नाही, असे म्हणून जवळ बोलावले. चित्ते कारच्या खिडकीजवळ जाऊन बोलत असताना आरोपीने अचानक त्यांच्या गळ्यातील साडेचार तोळ्याची सोन्याची चेन हिसकावून घेतली. दरम्यान, आरोपीने कारचा वेग वाढविला. चित्ते यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांना सुमारे १० फुट फरपटत नेल्याने ते खाली पडले. यात त्यांच्या पाय आणि हाताची कातडी सोलून गंभीर दुखापत झाली आहे.
घरी आल्यानंतर त्यांनी मुलीलासोबत घेऊन पोलिसात तक्रार दिली. या घटनेची माहिती कळताच पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, पोलीस निरीक्षक अशोक गिरी, कल्याण शेळके, बाळासाहेब आहेर आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, मनोज शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.