चिकलठाण्यातील रस्ते महानगरपालिकेच्या ठरावाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 17:39 IST2018-07-07T17:39:09+5:302018-07-07T17:39:41+5:30
या रस्त्यांची कामे करण्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) तयारी दर्शविली आहे; परंतु त्यासाठी महापालिकेचा ठराव मिळण्याची प्रतीक्षा आहे.

चिकलठाण्यातील रस्ते महानगरपालिकेच्या ठरावाच्या प्रतीक्षेत
औरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसी परिसरात आजघडीला खड्डेमय रस्त्यांमुळे माल वाहतूक करताना अनेकदा आर्थिक नुकसान होत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. या रस्त्यांची कामे करण्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) तयारी दर्शविली आहे; परंतु त्यासाठी महापालिकेचा ठराव मिळण्याची प्रतीक्षा आहे. हा ठराव मिळाल्यानंतरच रस्त्यांच्या कामाचा मार्ग मोकळा होणार आहे.
चिकलठाणा एमआयडीसी या औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांचा प्रश्न बिकट बनला आहे. गेल्या ४० वर्षांपासून या औद्योगिक वसाहतीतील उद्योगांकडून महसूल घेऊनही रस्ते दुरुस्त केलेले नाहीत. सर्व रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे उद्योजक, कामगार, सर्वसामान्य नागरिकांसह माल वाहतुकीसाठी गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
सध्या कार्यरत असलेले उद्योजक त्रस्त असून, या औद्योगिक क्षेत्राचा औद्योगिक विकास खुंटत असल्याची भावना उद्योजकांतून व्यक्त होत आहे.
जळगाव आणि अमरावती येथे महापालिका असून, तेथील औद्योगिक क्षेत्रातील रस्ते बांधणी, दुरुस्ती व देखभाल महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ करीत आहे. त्याच धर्तीवर चिकलठाणा एमआयडीसीतील रस्ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बांधून द्यावेत,अशी मागणी उद्योजकांनी केली. येथील उद्योगांची खराब रस्त्यांच्या त्रासातून सुटका करण्यासाठी लवकरात लवकर क ाम करण्याची मागणी ‘मसिआ’चे अध्यक्ष किशोर राठी यांनी केली आहे.
महानगरपालिकेला घ्यावा लागणार ठराव
२७ मार्च आणि १४ मे रोजी उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये चिकलठाणा येथील रस्ते एमआयडीसीने बांधून देण्याचे तत्त्वत: मान्य करण्यात आले. त्यासाठी महापालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वीच मनपाने एमआयडीसीला पत्र दिले; परंतु रस्त्यांच्या कामासाठी आता मनपाचा ठराव आवश्यक आहे. ठरावासंदर्भात महापालिकेबरोबर पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे ‘एमआयडीसी’चे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे म्हणाले.