छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने सोमवारी पैठण रोडवर ६० मीटर रस्ता रुंद करण्यासाठी मोहीम हाती घेतली. सकाळी ११ ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत ४७७ अनधिकृत मालमत्ता पाडण्यात आल्या. या मोहिमेत मनपाचे ३००, पोलिसांचे २०० अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. कांचनवाडी आणि नक्षत्रवाडी या दोन ठिकाणी सर्वाधिक मालमत्ता होत्या. मंगळवारी सकाळी पैठणकडे जाताना उजव्या बाजूने कारवाई करण्यात येणार आहे.
जालना रोडवर केम्ब्रिज ते मुकुंदवाडीपर्यंत महापालिकेने १३६४ अनधिकृत मालमत्ता जमीनदोस्त केल्या. त्यानंतर सोमवारी मनपा आणि पोलिसांनी आपला मोर्चा पैठण रोडकडे वळविला. डाव्या बाजूच्या मालमत्ता पाडण्याचा निर्णय मनपाने घेतला. त्या दृष्टीने पाच पथके प्रत्येक पाचशे मीटर अंतरावर तैनात केली. पहिल्या पथकाने महानुभाव आश्रम चौकात पहिला हल्ला माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हॉटेलवर केला. त्यांच्या हॉटेलचा दर्शनी भाग जेसीबीने पाडण्यात आला. महानुभाव आश्रमाची संरक्षक भिंत व मंदिराचा काही भाग देखील बाधित होत होता. आश्रमाच्या व्यवस्थापनाने स्वत:हून बांधकाम काढून घेण्यास सुरुवात केली. आश्रमाच्या शाळेला १५ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली. या भागातील काही उद्योजकांना त्यांच्या मालमत्ता काढून घेण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली, कारण त्यांच्याकडे बांधकाम परवानगी होती. पुढे वाळूज लिंक रोड चौकातील अनेक लहान मोठी हॉटेल बाधित होत होती. त्यांचे बांधकाम पाडले. पुढे अत्यंत विरळ स्वरूपात मालमत्ता होत्या. मोठ्या बांधकाम व्यावसायिकांनी स्वत:हून आपले लोखंडी पत्रे, होर्डिंग काढून घेतले. कांचनवाडी येथे लॅाज, दुकाने, शेड, कंपाऊंड, ओटे, गॅरेज, वॅाशिंग सेंटर, मेडिकल स्टोअर, डेली नीड्स, जाहिरात फलक काढण्याचा सपाटा मनपा पथकांनी लावला. या ठिकाणी मालमत्ताधारकांनी रिकामे केलेल्या लहान-मोठ्या मालमत्ता पाडण्यात आल्या. पैठण रोडवर मनपाच्या पेट्रोल पंपाचे जाहिरात फलकही काढण्यात आले. पैठणकडे जाताना डाव्या बाजूनेच गेवराई गावाच्या अलीकडे निसर्ग नर्सरीपर्यंत पथकाने कारवाई केली. या कारवाईत मनपा नगररचना विभागाचे उपसंचालक मनोज गर्जे, सहायक पोलिस आयुक्त रणजीत पाटील, मनपा उपायुक्त सविता सोनवणे, सहाय्यक आयुक्त अर्जुन गिराम, प्राजक्ता वंजारी, अर्चना राजपूत, रमेश मोरे, संजय सुरडकर, अशोक गिरी, समीउल्लाह, भारत बिरारे, राहुल जाधव, नईम अन्सारी आदी सहभागी झाले होते.
आज पुन्हा कारवाईमंगळवारी पैठणकडे जाताना उजव्या बाजूने कारवाई होईल. सोमवारी मनपा प्रशासक जी. श्रीकांत, पोलिस आयुक्त प्रवीण पवार दिवसभर संपूर्ण कारवाईवर लक्ष ठेवून होते.
वाहनसंख्या कमीजालना रोडच्या तुलनेत पैठण रोडवरील कारवाईसाठी वाहनसंख्या कमी करण्यात आली. १० जेसीबी, ४ पोकलॅन, १५ टिप्पर, २ रुग्णवाहिका, २ कोंडवाडा वाहने, २ अग्निशमन बंब, ४ इलेक्ट्रिक हायड्राॅलिक वाहनांचा कारवाईत समावेश होता.