हातावर ‘जय शिवराय’ असे लिहून रिक्षा चालकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 18:46 IST2021-09-03T18:45:35+5:302021-09-03T18:46:22+5:30
वाळूज परिसरात रिक्षा चालवून कुटुंबाची उपजीविका भागवीत असे.

हातावर ‘जय शिवराय’ असे लिहून रिक्षा चालकाची आत्महत्या
वाळूज महानगर : हाताच्या पंजावर ‘जय शिवराय’, मी आत्महत्या करीत आहे, असा मजकूर लिहून रिक्षाचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास विटावा गावात उघडकीस आली. प्रल्हाद बळीराम पोळ (५२), असे आत्महत्या करणाऱ्या रिक्षाचालकाचे नाव असून, आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
प्रल्हाद पोळ (रा. बनचिंचोली, ता. हदगाव, जि. नांदेड) पत्नी लता व मुलगा यांच्या सोबत विटावा येथे रामभाऊ गव्हाणे यांच्या घरात किरायाने राहत होते. वाळूज परिसरात रिक्षा चालवून ते कुटुंबाची उपजीविका भागवीत. महिनाभरापूर्वी त्यांचे वडील बळीराम पोळ यांचे निधन झाल्याने पत्नी लता पोळ ही मुलासह मूळ गावी गेलेली आहे. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास प्रल्हाद पोळ हे राहत्या घरी पंख्याला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. हा प्रकार लक्षात येताच बालाजी सूर्यवंशी व लक्ष्मण डोळस यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने प्रल्हाद यांना बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांना सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास प्रल्हाद यांस मयत घोषित केले.
हाताच्या पंजावर मजकूर लिहून संपविले जीवन
पत्नी व मुलगा गावी गेलेले असल्याने प्रल्हाद महिनाभरापासून घरी एकटेच होते. आत्महत्या करण्यापूर्वी प्रल्हाद यांनी हाताच्या पंजावर पेनाने ‘जय शिवराय’ मी आत्महत्या करीत आहे, असा मजकूर लिहिला असून, अशोक दामले या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ. योगेश कासरले करीत आहेत.