लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद- नगर महामार्गावर आॅटोरिक्षा पलटी झाल्याने एक जण ठार, तर तीन प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना लक्ष्मीमाता मंदिराजवळ घडली. रमेश रावसाहेब चव्हाण (३0, लासूरस्टेशन) असे मयताचे नाव आहे. जखमींना १०८ या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी घाटी दवाखान्यात दाखल करण्यात आले.वाळूजकडे प्रवासी घेऊन (एमएच-२० डीसी-३६११) ही आॅटोरिक्षा निघाली होती. सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास समोर एका दुचाकीस्वाराने अचानक ब्रेक दाबल्याने रिक्षाचालकाने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात ब्रेक मारला; परंतु रिक्षा भरधाव असल्याने ती दुभाजकावर जाऊन आदळली. प्रवासी उज्ज्वला मोरे, शोभा मोरे (रा. हनुमंतगाव) या सासू-सुना आॅटोतून खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला असून, त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातात रमेश रावसाहेब चव्हाण यांचा मृत्यू झाला, तर झोणकाबाई चव्हाण जखमी आहेत. घटनास्थळी रक्ताचे थारोळे तुंबले होते. रिक्षाचालकाचे नाव मात्र कळू शकले नाही. छावणी पोलीस व वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आॅटोखाली अडकलेल्या सासू-सुनेला कामगारांनी मदतकार्य करून बाहेर काढले. १०८ च्या मदतीने जखमींना दवाखान्यात पाठविले, तर खोळंबलेली वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली. नगर रोडवर सध्या वाहनांची वर्दळ वाढली असून, प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
नगर रोडवर रिक्षाला अपघात; एक ठार, तीन जण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:44 IST