‘शासन आपल्या दारी’ ही क्रांतिकारी संकल्पना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 20:04 IST2023-05-26T20:02:39+5:302023-05-26T20:04:37+5:30
‘शासन आपल्या दारी’ या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची मराठवाड्यातील सुरुवात कन्नड येथून करण्यात आली.

‘शासन आपल्या दारी’ ही क्रांतिकारी संकल्पना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कन्नड : आजपर्यंत जनतेला शासनाच्या दारी जावे लागत होते; मात्र शासनाकडे मोठी यंत्रणा असताना आपणही जनतेच्या दारी का जाऊ शकत नाही, असा विचार करून ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना राबविण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात केले.
‘शासन आपल्या दारी’ या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची मराठवाड्यातील सुरुवात कन्नड येथून आज करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, आमदार रमेश बोरनारे, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार उदयसिंग राजपूत, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील, संजनाताई जाधव, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, जि.प. सीईओ विकास मीना, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते आदींची उपस्थिती होती.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास ३२१ प्रकल्पांची संख्या आहे. या योजनेतून १ लाख ४९ हजार ५७२ लाभार्थ्यांना ५ हजार ४५७ कोटी रुपयांचा निधी वाटप होणार आहे. ५५१ कोटीचे साहित्य वाटप होणार आहे. सर्वसामान्यांना गरिबीतून बाहेर काढण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता देशातच नव्हे तर परदेशातही वाढली आहे. ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. संसदेच्या इमारतीच्या उद्घाटनाला विरोधी पक्ष विरोध करीत आहेत. विरोधी पक्ष एकत्र आले तरी मोदींना काहीही फरक पडणार नाही, असेही ते म्हणाले. यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले.