क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन रस्ता मृत्यूचा सापळा

By Admin | Updated: November 7, 2014 00:52 IST2014-11-07T00:37:20+5:302014-11-07T00:52:48+5:30

औरंगाबाद : क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन हा रस्ता मृत्यूचा सापळा होत आहे. ८० फूट रस्त्याचे काम रखडल्यामुळे तो रस्ता अपघातांना आमंत्रण देत आहे,

Revolution road to railway station road death trap | क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन रस्ता मृत्यूचा सापळा

क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन रस्ता मृत्यूचा सापळा

औरंगाबाद : क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन हा रस्ता मृत्यूचा सापळा होत आहे. ८० फूट रस्त्याचे काम रखडल्यामुळे तो रस्ता अपघातांना आमंत्रण देत आहे, तर व्हाईट टॉपिंगच्या रस्त्यांची कामे बंद पडली आहेत. ५० कोटींतून १४ व्हाईट टॉपिंगच्या रस्त्यांची कामे सुरू केली. त्यातील ४ रस्ते हाती घेतले. ते अर्धवट आहेत.
क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन (शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मार्ग) या रस्त्याचे काम १ जानेवारी २०१५ पर्यंत पूर्ण करावे. तसेच रस्त्याच्या अर्धवट कामामुळे दोन जणांचा बळी गेला. या प्रकरणी कंत्राटदाराविरोधात मनपाने पोलिसांत भा.दं.वि. ३०२ अन्वये तक्रार करावी, अशा सूचना खा. चंद्रकांत खैरे यांनी आज केल्या. महापौर कला ओझा, गजानन बारवाल, नंदकुमार घोडेले, सभापती विजय वाघचौरे, राजू वैद्य, शिवाजी बनकर, शहर अभियंता सखाराम पानझडे, हेमंत कोल्हे, उपअभियंता फड यांची याप्रसंगी उपस्थिती होती. या पाहणीत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले नव्हते. दरम्यान, उपमहापौर संजय जोशी यांनीही कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी केली.
२१ महिन्यांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. हलगर्जीपणामुळे ते काम रखडले आहे. यावरून खा. खैरे यांनी शहर अभियंते पानझडे, कोल्हे यांचा रस्त्यावरच पानउतारा केला. कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. रेल्वे प्रशासनाने जागेसाठी २ कोटी रुपये मागितले आहेत. भूसंपादन झाले तर पुढील रस्ता होईल. दोन कोटी रुपये द्या, असे खा. खैरे यांनी आयुक्त पी.एम. महाजन यांना सुचविले.
आऊटपूट शून्य : विनोदी पाहणी
रस्ता पाहणी करण्याची आज काही पहिली वेळ नव्हती. मनपा पदाधिकारी, नेत्यांनी अनेक वेळा रस्त्याची पाहणी केली. मात्र, आऊटपूट काहीच नाही. खेचाखेची, माध्यम प्रतिनिधींसमोर अभियंत्यांना विनोदी शालजोडे मारणे, कंत्राटदारला धमकाविण्यासाठीच ही पाहणी असते.
मानापमान कायम
पश्चिम मतदारसंघाचे आ. संजय शिरसाट यांच्या कार्यालयात खा. खैरे गेले नाहीत. दोघांमधील मानापमान नाट्य अजून संपलेले दिसत नाही. पत्रकारांनी त्यांना कार्यालयात जायचे का, असा सवाल केला. यावर खा. खैरे यांनी नकार दिला. विधानसभा निवडणुकीत पश्चिम मतदारसंघातील प्रचारावरून आ. शिरसाट आणि खा. खैरे यांच्यात दुरावा निर्माण करणाऱ्या अनेक बातम्या आल्या. त्या बातम्यांचे घाव अजूनही कायम असल्यामुळे खा. खैरे हे आ. शिरसाट यांच्या कार्यालयात गेले नाहीत.
महापौरांनी केली मदत
४ नोव्हेंबर रोजी मनपा स्वच्छता निरीक्षक चव्हाण यांची मुलगी स्वाती चव्हाण यांचे निधन झाले. रस्त्यावर दुभाजक नसल्यामुळे वाहन चालविताना तोल गेला, त्यातच दुसऱ्या वाहनाची तिला धडक बसली आणि ती जखमी झाली. महापौर कला ओझा या रेल्वेस्टेशनकडे जात असताना त्यांनी तो अपघात पाहिला. स्वातीला त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यापासून रक्त उपलब्ध करून देण्यापर्यंत मदत केली.

Web Title: Revolution road to railway station road death trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.