रिक्षातून प्रवास करताना सेवानिवृत्ताचे दागिने, रोकडसह दोन लाखांचा ऐवज लंपास
By राम शिनगारे | Updated: March 22, 2023 17:03 IST2023-03-22T17:01:08+5:302023-03-22T17:03:08+5:30
सिडको बसस्थानक परिसरातील घटना : सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

रिक्षातून प्रवास करताना सेवानिवृत्ताचे दागिने, रोकडसह दोन लाखांचा ऐवज लंपास
छत्रपती संभाजीनगर : एका सेवानिवृत्त सिडको बसस्थानक परिसरातील आंबेडकर चौकाकडे रिक्षातून जात असताना त्यांच्या जवळील २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला असल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८.३० वाजता घडली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
सेवानिवृत्त प्रमोद रामचंद्र भरड (रा.पिसादेवी) हे सिडको बसस्थानक येथून आंबेडकर चौक याठिकाणी जाण्यासाठी एका रिक्षात बसले होते. रिक्षामध्ये प्रवास करतानाच त्यांच्याजवळील दोन तोळ्याची सोन्याची माळ, दोन तोळ्याच्या हातातील पाच सोन्याच्या अंगठ्या, तीन तोळ्यांचे सोन्याचे कानातील नऊ जोड, ५ ग्रॅमचे सोन्याचे मनीमंगळसूत्र आणि १० हजार रुपये रोख असे एकूण २ लाख २० हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. या प्रकरणात तब्बल महिनाभरानंतर सिडको पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. अधिक तपास श्रेणी उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.