निवृत्त अधिकार्याकडे ८० लाखांचे घबाड
By Admin | Updated: May 18, 2014 01:23 IST2014-05-18T01:04:36+5:302014-05-18T01:23:23+5:30
औरंगाबाद : जातपडताळणी समितीच्या निवृत्त संशोधन अधिकार्याच्या घर झडतीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांना तब्बल ८० लाख रुपयांचे घबाड हाती लागले.

निवृत्त अधिकार्याकडे ८० लाखांचे घबाड
औरंगाबाद : जातपडताळणी समितीच्या निवृत्त संशोधन अधिकार्याच्या घर झडतीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांना तब्बल ८० लाख रुपयांचे घबाड हाती लागले. दरम्यान, या अधिकार्याने शासकीय सेवेच्या कार्यकाळात १२ लाख ९१ हजार ९८७ रुपयांची अपसंपदा प्राप्त केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी जातपडताळणी समितीचे निवृत्त संशोधन अधिकारी रामदास नारायण वैद्य व त्यांची पत्नी तारामती रामदास वैद्य (दोघे रा. साईनगर, सिडको एन-६) यांच्याविरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, रामदास वैद्य यांना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी कळविले आहे की, निवृत्त संशोधन अधिकारी रामदास वैद्य यांनी १९७५ ते २०१० या त्यांच्या शासकीय सेवेच्या कालावधीत भ्रष्टाचार करून बेहिशेबी मालमत्ता कमाविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सं.दे. बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सुरेश वानखेडे, रामनाथ चोपडे, प्रताप शिकारे, निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, नीलेश देसले व पोलीस कर्मचार्यांनी रामदास वैद्य यांच्या घराची झडती घेतली. यात ८० लाख रुपयांचे आठ प्लॉट खरेदी केल्याची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली. वैद्य हे सुरुवातीला १९७५ ते १९८५ यादरम्यान दूरसंचार विभाग व राज्य परिवहन विभागात कार्यरत होते. त्यानंतर ते समाजकल्याण अधिकारी म्हणून रुजू झाले. सन २००७ ते २०१० पर्यंत ते जातपडताळणी समितीचे संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत होते. वैद्य यांनी आपल्या शासकीय सेवा कालावधीमध्ये वाशिम जिल्ह्यातील मौजे आमखेडा, ता. मालेगाव येथे पत्नी तारामती यांच्या नावे ४ एकर १८ गुंठे शेती घेतली. औरंगाबादेत सिडको एन-६ परिसरातील साईनगरमध्ये १,९३६ स्वेअर फुटाचा प्लॉट खरेदी करून तीन मजली इमारत उभारली. दोन दुचाकी व चारचाकी वाहने खरेदी केली. त्यांनी सेवाकाळात कमावलेल्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा १२ लाख ९१ हजार ९८७ रुपयांची अपसंपदा प्राप्त केल्याचे निष्पन्न झाले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत रामदास वैद्य यांच्या सिडको एन-६ येथील घर तसेच वाशिम जिल्ह्यातील शेतीच्या झडतीचे काम सुरू आहे. याशिवाय वैद्य व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे असलेल्या बँक खात्यांची माहिती घेण्याचे काम सुरूच आहे. पोलीस उपअधीक्षक रामनाथ चोपडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.