निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे ८७व्या वर्षी निधन; खाजगी रुग्णालयात सुरु होते उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 09:52 IST2025-01-25T09:37:06+5:302025-01-25T09:52:25+5:30

Narendra Chapalgaonkar passed away : चपळगावकर यांना अनेक पुरस्कारांनी करण्यात आलं होतं सन्मानित, वृत्तपत्रातूनही केलं दीर्घकाळ लेखन

Retired Justice Narendra Chapalgaonkar passed away on Saturday morning at the age of 87 | निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे ८७व्या वर्षी निधन; खाजगी रुग्णालयात सुरु होते उपचार

निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे ८७व्या वर्षी निधन; खाजगी रुग्णालयात सुरु होते उपचार

Narendra Chapalgaonkar passed away : माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे शनिवारी पहाटे वयाच्या ८७व्या वर्षी निधन झाले. एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. न्यायमूर्ती चपळगावकर हे वर्धा येथे झालेल्या ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी विपुल प्रमाणात वैचारिक लेखन केले. हैदराबाद मुक्तिसंग्रामाशी संबंधित वेगवेगळ्या पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी वृत्तपत्रातूनही दीर्घकाळ लेखन केले. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि भक्ती, सायली व मेघना या तीन मुली व एक मुलगा आहे.

नरेंद्र चपळगावकर यांच्याविषयी...

  • नरेंद्र चपळगावकर यांचा जन्म १९३८ सालचा. ते सोलापूर जिल्ह्यातील चपळगाव येथील असले तरी त्यांच्या कुटुंबाच्या गेल्या काही पिढ्या बीड येथे गेल्यामुळे ते मूळचे बीडचेच झाले.
  • हैदराबाद संस्थानात नोकरी मिळेल या शक्यतेने त्यांचे पूर्वज बीडला म्हणजे हैदराबाद संस्थानात आले होते. पण पुढे याच कुटुंबाचा हैदराबाद मुक्तीसंग्राम, मराठवाड्यातील सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय वाटचालीत महत्त्वाचा वाटा राहिला.
  • माजी न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर यांच्या ग्रंथलेखनाची सुरुवात कायदेविषयक पुस्तकांनी झाली. अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्याची ओळख करुन देणारे एक पुस्तक आणि निवडणूक कायद्यावरील लॉ ऑफ इलेक्शन्स या इंग्रजी पुस्तकाचे त्यांनी सुरुवातीला लेखन केले.
  • त्यानंतर सुधीर रसाळ यांच्याबरोबर त्यांनी अनंत भालेराव यांच्या निवडक अग्रलेखांचे पुस्तक संपादित केले. त्याबरोबरच भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक त्यांनी लिहून प्रसिद्ध केले.
  • स्वामी रामानंद तीर्थ यांचा मराठवाडा, हैदराबादच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावर सखोल प्रभाव आहे. स्वामीजी आणि चपळगावकर यांच्या कुटुंबाचा चळवळीच्या काळापासून संबंध असल्यामुळे चपळगावकर यांनी त्यांचे कर्मयोगी संन्यासी नावाने चरित्र लिहिले. त्यासाठी त्यांनी हैदराबाद, दिल्ली येथिल कागदपत्रांचा अभ्यास केला आणि हे पुस्तक सिद्ध केले.
  • चपळगावकर यांचे सर्व साहित्य वेबसाईट वर उपलब्ध करण्यात आले आहे.
     

समृद्ध वैचारिक साहित्यिक परंपरेचा शेवट!

निवृत्त न्यायमूर्ती नाना चपळगावकर यांचे निधन म्हणजे एका समृद्ध वैचारिक साहित्यिक परंपरेचा शेवट असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. माझ्या वडिलांचे नाव ही नाना च होते.या नानाच्या रूपाने माझ्या औरंगाबाद च्या वास्तव्यात हक्काचे आणखीन एक वडील मिळाले.त्यांच्याशी संवाद म्हणजे विविध सामाजिक,साहित्यिक,राजकीय विषयावर बौद्धिक मेजवानीच असे.गेल्या डिसेंबर मध्येच अशी शेवटची संवादिनी आम्ही अनुभवली. उशीरा का होईना पण वर्धा येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदाचा मान त्यांना मिळाला.खरे तर त्यांची प्रतिभा,त्यांचे वैचारिक द्रष्टेपण या मान सन्मानाच्या पलीकडचे होते.त्यांचे या उतारवयातील प्रगल्भ लेखन म्हणजे सहज हातपाय गाळून मोकळे होणाऱ्या तरुण पिढी साठी आदर्श वस्तुपाठा सारखे होते.अगदी ८६ व्या वर्षी देखील त्यांचे दोन पुस्तकाचे लेखन सुरू होते.पुढच्या भेटीत ही पुस्तके भेट देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.आता ती पुस्तके मिळतील पण त्यांच्या हातून नाही,ही हळहळ कायम सलत राहील.आज पुनश्च पोरके झाल्यासारखे वाटते आहे. ती. नानांना भाव पूर्ण आदरांजली, अशा शब्दांत माजी कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी चपळगांवकर यांना आदरांजली वाहिली.

Web Title: Retired Justice Narendra Chapalgaonkar passed away on Saturday morning at the age of 87

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.