‘शेवरलेट’ विसर्जन मिरवणुकीतून निवृत्त
By Admin | Updated: September 8, 2014 00:32 IST2014-09-08T00:32:21+5:302014-09-08T00:32:44+5:30
प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद गणेश महासंघाचा मानाचा गणपती विसर्जनासाठी ६५ वर्षांपासून ज्या ऐतिहासिक ‘शेवरलेट’ गाडीत बसवून मिरवणुकीत नेला जात असे.

‘शेवरलेट’ विसर्जन मिरवणुकीतून निवृत्त
प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद
गणेश महासंघाचा मानाचा गणपती विसर्जनासाठी ६५ वर्षांपासून ज्या ऐतिहासिक ‘शेवरलेट’ गाडीत बसवून मिरवणुकीत नेला जात असे. तिचा सारथी कै. सचिन चौहानचे दोन वर्षांपूर्वी निधन झाल्याने आता हे वाहनही मिरवणुकीतून रिटायर्ड झाले आहे. यामुळे यंदा मानाच्या गणपतीला निरोप देण्यासाठी दुसरे वाहन गणेशभक्तांना पाहण्यास मिळणार आहे.
लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेने स्वातंत्र्यपूर्व काळात शहरात गणेशोत्सवाला सुरुवात झाली. १९२४ मध्ये महासंघाची स्थापना झाली. तेव्हाचे अध्यक्ष स्व. संग्रामसिंह चौहान यांनी १९४७ मध्ये ४५० हाली (निजामकालीन नाणे) देऊन शेवरलेट गाडी खरेदी केली होती.
गाडीचे मॉडेल १९२८ चे होते. तेव्हा याच गाडीतून गणेश महासंघाचा गणपती विसर्जनासाठी नेला जायचा. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गणेश महासंघाचे रूपांतर उत्सव समितीमध्ये झाले; पण महासंघाचा मानाचा गणपती याच शेवरलेट गाडीतून नेला जात असे. संग्रामसिंह चौहान यांच्यानंतर त्यांचा मुलगा सुरेंद्रसिंह यांनी या गाडीला मुलासारखे सांभाळले.
त्यांनी अनेक वर्षे हे वाहन श्री विसर्जन मिरवणुकीत चालविले. मागील २२ वर्षांपासून त्यांचा मुलगा सचिन हा मानाच्या गणपतीच्या गाडीचा सारथी बनला होता. सचिनचे १४ जून २०१२ रोजी आकस्मिक निधन झाले. सचिनच्या पश्चात ही परंपरा कायम राखण्यासाठी त्याचे वडील सुरेंद्रसिंह चौहान यांनी पुन्हा एकदा गाडीचे स्टेअरिंग हाती घेतले होते. मात्र, आता वयोमानाप्रमाणे त्यांना गर्दीतून वाहन चालविणे व तासन्तास एकाच ठिकाणी बसणे जमत नाही. यामुळे त्यांनी श्री विसर्जन मिरवणुकीत इतिहास घडविणाऱ्या शेवरलेट गाडीची सेवा बंद केली.
विसर्जन मिरवणुकीचा दिवस जसा जवळ यायचा तशी सचिन चौहानची जोरात तयारी सुरू व्हायची. शेवरलेट गाडीची सर्व्हिसिंग करणे, तिला नवा रंग देणे, गाडी शहरात चालवून बघणे व विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी फुुलांनी गाडी सजविणे व गणेश महासंघाच्या मानाच्या गणपतीला मिरवणुकीतून नेणे हा सचिनचा दरवर्षीचा क्रम ठरलेला होता. हसतमुख चेहऱ्याच्या सचिनची मागील वर्षापासून श्री विसर्जन मिरवणुकीत महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनाच नव्हे तर गणेशभक्तांनाही आठवण येते.