खासगी संस्थाचालकांच्या शाळाबंद आंदोलनाला प्रतिसाद
By Admin | Updated: July 5, 2016 00:06 IST2016-07-04T23:54:22+5:302016-07-05T00:06:03+5:30
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीतर्फे विविध मागण्यांसाठी सोमवारी एकदिवसीय शाळा बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला.

खासगी संस्थाचालकांच्या शाळाबंद आंदोलनाला प्रतिसाद
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीतर्फे विविध मागण्यांसाठी सोमवारी एकदिवसीय शाळा बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला. समितीच्या सदस्यांनी विविध शाळांमध्ये जाऊन शाळा बंद करण्याची विनंती केली. तरी काही शाळा आंदोलन सुरू असतानाही सुरूच होत्या. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीपासून आंदोलनाचा इशारा देणाऱ्या खासगी शिक्षण संस्थाचालकांनी आज शाळा बंद आंदोलनाचा निर्णय घेतला होता. राज्यातील खासगी शाळांमध्ये एक दिवस बंद पाळत शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात येणार असल्याचे समितीकडून सांगण्यात आले होते.
शाळा बंदचा इशारा दिल्याने पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. शाळा बंद करण्यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी विविध शाळांसमोर जाऊन आंदोलन केले. शिशु विकास मंदिर, अनंत भालेराव विद्या मंदिर, श्रेयस हायस्कूल, जागृती हायस्कूल, ज्ञानप्रकाश विद्या मंदिर, रेणुका हायस्कूल अशा शाळांमध्ये जात शाळा बंद करण्याचे आवाहन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले. आंदोलन यशस्वी करण्यासाठी मनोज पाटील, वाल्मीक सुरासे, मोहन सोनवणे, सुभाष महेर, नामदेव सोनवणे, भाऊसाहेब कराळे, पंडित डोंगरे, अंकुश पाल, पांडुरंग गोकुंडे, विजय द्वारकुंडे, हरी मोहिते, मंगला हुमे, राजेश घाटे, आनंद खरात, महेश पाटील यांनी परिश्रम घेतले.
अशा आहेत मागण्या...
घोषित शाळांना प्रचलित नियमानुसार पात्र टप्प्याचे अनुदान त्वरित देण्यात यावे, अघोषित शाळांना त्वरित घोषित करून अनुदानाची तरतूद करण्यात यावी, खासगी शिक्षण संस्थांची स्वायत्तता कायम राखावी. २८ आॅगस्टचा निर्णय रद्द करावा इ. मागण्या आहेत. शासनाने चर्चेला बोलावून योग्य निर्णय न घेतल्यास २९ जुलैपासून बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व शाळांनी शाळा बंद आंदोलनात सहभाग घेतल्याचा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी केला.