हक्काच्या पाण्यासाठी लढा देण्याचा मराठवाड्यात निर्धार, सर्वपक्षीय आमदार एकवटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 05:33 IST2018-10-21T05:33:38+5:302018-10-21T05:33:55+5:30
नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील नेत्यांच्या राजकीय दबावापोटी वरच्या धरणांतील पाणी जायकवाडी धरणात सोडण्यासाठी शासन टाळाटाळ करीत आहे.

हक्काच्या पाण्यासाठी लढा देण्याचा मराठवाड्यात निर्धार, सर्वपक्षीय आमदार एकवटले
औरंगाबाद : नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील नेत्यांच्या राजकीय दबावापोटी वरच्या धरणांतील पाणी जायकवाडी धरणात सोडण्यासाठी शासन टाळाटाळ करीत आहे. हक्काच्या पाण्यासाठी मात्र मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी चुप्पी साधल्याचे ‘लोकमत’ने १९ आॅक्टोबर रोजी वृत्त प्रकाशित केले. वृत्त प्रकाशित होताच अखेर मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांनी एकत्र येऊन हक्काच्या पाण्यासाठी एकत्रित लढा देण्याचा निर्धार शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
पत्रकार परिषदेस प्रशांत बंब, अब्दुल सत्तार, इम्तियाज जलील, सतीश चव्हाण, अतुल सावे, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हे जिल्ह्यातील आमदार, तसेच जि. प. अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगावकर, वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांची उपस्थिती होती.
आ. बंब म्हणाले, हक्काच्या पाण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी २२ आॅक्टोबरला सर्वपक्षीय आमदारांची बैठक होत आहे. प्रत्येक खोऱ्यानुसार किती पाणी आहे, किती पाणी जायकवाडीत आणले पाहिजे, हे ठरविले पाहिजे. समन्यायी पाण्यासंदर्भात कोणाचेही दुमत नाही.
>नाक दाबून तोंड उघडता येते
आठवडाभरात हा प्रश्न सुटला नाही तर नाक दाबून तोंड कसे उघडायचे, हे मराठवाड्यातील लोकांना माहीत आहे. आम्ही २२ आॅक्टोबरपर्यंत संयमाने राहू. मुख्यमंत्री यावर निर्णय घेतील, अशी अपेक्षा असल्याचे आ. सत्तार म्हणाले.