निवासी डॉक्टरांचा संप सुरूच
By Admin | Updated: October 9, 2014 00:50 IST2014-10-09T00:43:26+5:302014-10-09T00:50:23+5:30
औरंगाबाद : रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ घाटीतील निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने सोमवारी मध्यरात्रीपासून संप सुरू केला आहे.

निवासी डॉक्टरांचा संप सुरूच
औरंगाबाद : रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ घाटीतील निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने सोमवारी मध्यरात्रीपासून संप सुरू केला आहे. आज बुधवारी संपकरी डॉक्टरांनी आरोपींविरोधात डॉक्टर संरक्षण कायद्यानुसार गुन्हे नोंदवून त्यांना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी संप सुरूच ठेवला. या संपामुळे घाटीच्या रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (घाटी) मेडिसीन विभागात कार्यरत असलेले निवासी डॉक्टर हेमंत चिमुटे व त्यांचे सहकारी आणि रुग्णाचे नातेवाईक यांच्यात सोमवारी मध्यरात्री किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर भांडणात झाले. याप्रसंगी डॉ. चिमुटे यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. या घटनेत डॉक्टरांनीही आपल्याला शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारींवरून बेगमपुरा पोलीस ठाण्यात परस्परविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेनंतर घाटीतील समस्त निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. कालपासून सुरू झालेल्या या संपाचा परिणाम रुग्णसेवेवर दिसून आला. नेहमीप्रमाणे आज विविध वॉर्डांत निवासी डॉक्टर कार्यरत दिसले नाहीत. अपघात विभागात सहायक प्राध्यापक दर्जाच्या वरिष्ठ डॉक्टरांना ड्यूटी देण्यात आली आहे. शिवाय बाह्यरुग्ण विभागातही वरिष्ठ डॉक्टरांनी आज रुग्णतपासणी केली.
अधिष्ठाता डॉ. के.एस. भोपळे यांनी आज संपकरी डॉक्टरांसोबत दोन बैठका घेऊन संप मागे घेण्याचे आवाहन केले. यावेळी निवासी डॉक्टरांनी मारहाण करणाऱ्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचे सांगितले. शिवाय मार्डच्या अन्य मागण्यांकडेही त्यांचे लक्ष वेधले.
पोलीस आयुक्तांना निवेदन
मार्ड संघटनेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या आरोपींना डॉक्टर संरक्षण कायद्यातील कलमानुसार गुन्हे नोंदविण्यात यावा, तसेच त्यांना तातडीने अटक करावी, अशी विनंती केली.