निवासी डॉक्टरांचा संप टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:35 IST2017-11-14T00:35:12+5:302017-11-14T00:35:16+5:30
घाटी, पोलीस प्रशासनासोबत झालेल्या सामंजस्य बैठकीनंतर मार्डच्या डॉक्टरांनी पवित्रा बदलत संपावर जाण्याचे टाळले.

निवासी डॉक्टरांचा संप टळला
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टराला झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर मार्ड संघटनेने सोमवारी (दि.१३) सामूहिक पलायनाचा म्हणजे संपाचा इशारा दिला. परंतु घाटी, पोलीस प्रशासनासोबत झालेल्या सामंजस्य बैठकीनंतर मार्डच्या डॉक्टरांनी पवित्रा बदलत संपावर जाण्याचे टाळले.
मेडिसीन विभागात उपचार सुरू असताना तरुणाच्या मृत्यूनंतर रविवारी निवासी डॉ. आकाश सिंग यांना नातेवाईकांनी मारहाण केली होती. या घटनेनंतर मार्ड संघटनेने सोमवारी सामूहिक पलायनावर जाण्याचा इशारा दिला. यावर तोडगा काढण्यासाठी सकाळी मार्ड संघटनेचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी, घाटी प्रशासन, सुरक्षा बल विभागप्रमुखांची बैठक झाली. यावेळी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त एच. एस. भापकर, जी. डी. कोळेकर, पोलीस निरीक्षक एस. ए. उदार, सुरक्षारक्षक अधिकारी सत्यनारायण जयस्वाल आदी उपस्थित होते. दरम्यान, सायंकाळीही मार्डच्या पदाधिकाºयांसोबत बैठक घेण्यात आली.
डॉ. येळीकर म्हणाल्या, डॉक्टरवर हल्ला झाल्यावर त्याला गुन्हा दाखल करावा लागतो. या प्रकरणात प्रशासन तुमच्या पाठीशी उभे राहिल्याने आरोपीला शिक्षा झाली. यापुढेही प्रशासन तुमच्या सोबतच राहील. मात्र, तुम्हीदेखील रुग्णांशी वागताना सौजन्य ठेवा, उत्तम संवाद ठेवा. कारण घटनास्थळी आम्ही किंवा पोलीस तुमच्या मदतीला नसतील तर तुमची वागणूकच तुमची मदत करील. डॉ. भारत सोनवणे, डॉ. सुरेश हरबडे यांनीही मार्गदर्शन केले.
बारकोड सिस्टीम
रुग्णांना भेटण्यासाठी येणा-या नातेवाईकांसाठी पास पद्धत सक्षमपणे राबविण्याची मागणी होत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आता बारकोड सिस्टीम राबविण्याचा विचार घाटी प्रशासनाकडून सुरू आहे.