उतरत्या क्रमाने, नवीन पद्धतीनुसार पडणार छत्रपती संभाजीनगर मनपा प्रभागात आरक्षण!
By मुजीब देवणीकर | Updated: October 29, 2025 16:55 IST2025-10-29T16:50:06+5:302025-10-29T16:55:02+5:30
निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले २६ पानांचे मार्गदर्शन पत्र

उतरत्या क्रमाने, नवीन पद्धतीनुसार पडणार छत्रपती संभाजीनगर मनपा प्रभागात आरक्षण!
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणूकीचा बिगुल यापूर्वीच वाजला आहे. हळूहळू निवडणुकीची प्रक्रिया पुढे नेण्याचे काम राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू आहे. ११ नोव्हेंबर रोजी शहरातील २९ प्रभागांत आरक्षण टाकण्यासाठी सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीसाठी आयोगाने महापालिकेला २६ पानांचे मार्गदर्शन करणारे पत्र पाठविले असून, त्यात उतरत्या क्रमाने आणि नवीन पद्धतीनुसार आरक्षण पडणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, आरक्षणाची मानसिक तयारी ठेवत उमेदवारांनी जोर-बैठकांना सुरुवात केली आहे.
२०१५ मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. २०२० मध्ये निवडणूक अपेक्षित होती. मात्र, ती लांबत गेली. पाच वर्षे उलटले तरी निवडणूक होत नसल्याने इच्छुकांनी आशाच सोडून दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच राज्य निवडणूक आयोगाला ३१ जानेवारीपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे आदेश दिले. त्यानंतर यंत्रणा जोमाने कामाला लागली. अगोदर ११५ नगरसेवक निवडण्यासाठी २९ प्रभाग तयार करण्यात आले. त्यावर सूचना हरकती घेऊन प्रभाग अंतिम केले. ही प्रक्रिया पूर्ण होताच आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आयोगाने ही तारीखही निश्चित केली. ११ नाेव्हेंबर रोजी आरक्षण सोडत निघेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ११५ नगरसेवकांमध्ये ५० टक्के आरक्षण टाकण्यासाठी अगोदर आयोगाची सदस्य संख्येला मंजुरी घेतली जाईल. त्यानंतर उतरत्या क्रमाने एस.टी. आणि एससी प्रवर्गासाठी थेट आरक्षण पडेल. त्यातील महिलांसाठी सोडत काढली जाईल. ओबीसी प्रवर्गासाठीही आरक्षण सोडतीचा आधार घेतला जाणार आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वाधिक जिथे असेल तेथून उतरत्या क्रमाने आरक्षण पडेल, असेही आयोगाने म्हटले आहे.
कोणत्या प्रवर्गासाठी किती आरक्षण
प्रवर्ग----जागा
ओबीसी-३१
महिला-१६
...........................
एस.टी. - २
महिला-०१
..............................
एससी -२२
महिला-११
....................................
सर्वसाधारण महिला- ३०
.........................................
एकूण ५५ जागा आरक्षित
..............................................
प्रभागावर आरक्षण नंतर क्रमांक
सोडत काढताना प्रभागावर आरक्षण पडेल. उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक १५ सोडत काढल्यानंतर अ, ब, क, ड असा उल्लेख करून ज्या प्रवर्गासाठी आरक्षण काढले ते अ, ब प्रवर्गात जाईल, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. यापूर्वी संबधित वॉर्ड कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होता, याचा संदर्भ गृहीत धरला जाणार नाही. आरक्षण चक्रानुक्रमे फिरविण्यासाठी ही निवडणूक पहिली असे गृहीत धरले जाईल.