एचएसआरसी नंबरप्लेट देणाऱ्या सेंटरवर लक्ष कुणाचे? बदलणारे कमी, वाहनधारकच बनले कामगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 16:40 IST2025-03-25T16:38:30+5:302025-03-25T16:40:25+5:30

जुनी नंबरप्लेट घरी काढा, नंतरच एचएसआरसी प्लेट बसवण्यास जा; वाहनधारकांना मन:स्ताप

Remove the old number plate at home, then go and install the HSRC plate; Vehicle owners are upset | एचएसआरसी नंबरप्लेट देणाऱ्या सेंटरवर लक्ष कुणाचे? बदलणारे कमी, वाहनधारकच बनले कामगार

एचएसआरसी नंबरप्लेट देणाऱ्या सेंटरवर लक्ष कुणाचे? बदलणारे कमी, वाहनधारकच बनले कामगार

छत्रपती संभाजीनगर : ऑनलाइन अपॉइंटमेंटप्रमाणे तुम्ही एचएसआरसी प्लेट बसवण्यास जात असाल तर किमान अर्धा दिवस राखून ठेवलेलाच बरा. शिवाय जुनी नंबर प्लेट तुम्ही घरीच काढा. कारण त्या सेंटरवर या नंबर प्लेट काढण्यासाठी पान्हे, स्क्रू ड्रायवर, पकड आदी साहित्य नसते. अल्प परिश्रमात ती निघाली तर ठीक नाहीतर सेंटरवरून तुम्हाला गॅरेजवर जाऊन जुनी नंबर काढून आणावी लागते. नंतरच एचएसआरसी प्लेट बसवली जाते, यासह अनेक प्रकारे वाहनधारकांची लूट केली जाते आहे. याकडे आरटीओने चक्क दुर्लक्ष केले आहे.

सन २०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरसी प्लेट बसविणे सरकारने अनिवार्य केल्यानंतर अनेकांनी ऑनलाइन पैसे भरून सेंटर अपॉइंटमेंट घेतली. नियोजित तारखेनुसार वाहनमालक तेथे गेल्यावर त्यांना येणारे अनुभव त्रासदायक आहेत.

प्लास्टिक फ्रेम घ्या, अन्यथा...
बीड बायपासवरील सेंटरवर आलेल्या वाहनधारकांना नंबर प्लेट बदलण्यासाठी टोकन नंबर घेताना प्लास्टिक फ्रेम घेण्याचे सांगण्यात येत होते. ती घेण्यास नकार देणाऱ्या लोकांना नवी नंबर प्लेट बसवताना तुटफूट झाल्यास आम्ही जबाबदार नाही, असे धमकावले जात होते. प्रतिप्रश्न करून जो कुणी ही प्लास्टिक फ्रेम घेत नव्हता, त्याचे प्लेट लवकर बदलून दिले जात नव्हते. त्याला चार - ते पाच तास ताटकळत ठेवले जात होते.

मोठी गर्दी, प्लेट बदलणारे कमी
अनेक सेंटरवर वाहनमालकांची प्रचंड गर्दी होते आहे. परंतु, तेथे प्लेट बदलणाऱ्या कामगारांची संख्या अल्प आहे. त्यामुळे बरेच तास थांबावे लागते. त्यातही तेथील कामगारांना काही चिरीमिरी दिली की, टोकन नंबर बाजुला ठेवून ते पटकन नंबर प्लेट बसवून देत होते. एखाद्याने नियम दाखवला तर त्याची जुनी नंबर प्लेट निघत नाही, असे सांगून बाहेर गॅरेजवरून काढून आणण्यास सांगितले जात होते. जुनी नंबर प्लेट काढण्यास आमच्याकडे साहित्य नाही, आम्ही केवळ नवी नंबर प्लेट बसवितो, असे सांगून तुम्ही तुमचे लेटर वाचून काढा, असा शहाजोग सल्लाही ते ऐकवत होते.

वाहनधारकच बनले कामगार
सेंटरमधील हे वातावरण पाहून वाद घालण्यापेक्षा वाहनधारकच आपल्या वाहनांची जुनी नंबर प्लेट काढत होते. त्यासाठी आपल्या वाहनातील पकड, स्क्रूड्रायवरची शोधाशोध केली जात होती. ज्यांनी नंबर प्लेट काढली त्या वाहनांना नवी नंबर प्लेट लावतानाही वाहनधारकांच्या ‘हाता’कडे हे कामगार पाहात होते. शिवाय येथे कामगारांची संख्या कमी असल्यामुळे वाहनधारकांनाच नंबरप्लेट बदलण्यापासून नवी बसविण्यासाठी सर्व मदत सेंटरच्या कामगारांना करावी लागते. नव्हे तशी मदत न केल्यास ते कामगार तुमच्या वाहनाकडे येतच नाहीत, असेच चित्र या सेंटरमध्ये होते.

जुन्या नंबर प्लेटचे काय?
जुन्या काढलेल्या नंबर प्लेट हे सेंटरचालक ठेवून घेतात. त्यातून शेकडो क्विंटलचे लोखंडाचे भंगार या सेंटरवर जमा झाले होते. या भंगाराच्या पैसे कोण घेणार, असा प्रश्नही त्यातून पुढे आला आहे.

वाहनधारकांनी तक्रार करावी
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासंदर्भात वाहनधारकांच्या काही तक्रारी असल्यास आरटीओ कार्यालयास करता येईल. या तक्रारीची शहानिशा करून पुढील कारवाई केली जाईल.
- विजय काठोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: Remove the old number plate at home, then go and install the HSRC plate; Vehicle owners are upset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.