फळा येथे वर्षभर धार्मिक कार्यक्रम
By Admin | Updated: July 30, 2014 00:47 IST2014-07-29T23:51:16+5:302014-07-30T00:47:41+5:30
पालम : तालुक्यातील फळा येथील संत मोतीराम महाराज यांच्या मंदिरात वर्षभर सप्ताहाचा कार्यक्रम सुरू आहे. या सप्ताहात दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे.

फळा येथे वर्षभर धार्मिक कार्यक्रम
पालम : तालुक्यातील फळा येथील संत मोतीराम महाराज यांच्या मंदिरात वर्षभर सप्ताहाचा कार्यक्रम सुरू आहे. या सप्ताहात दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. या कार्यक्रमाची सांगता १५ आॅगस्ट रोजी होणार आहे.
तालुक्यातील फळा येथे वारकरी संप्रदायातील संत मोतीराम महाराज यांची गोदाकाठावर समाधी आहे. या समाधीस ४९ वर्षे पूर्ण झालेले आहेत. ५० व्या वर्षानिमित्त वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांच्या सहभागामुळे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर सप्ताहाची सुरुवात करण्यात आली होती. सप्ताहाच्या या कार्यक्रमाला ११ महिने पूर्ण झाले आहेत. या कालावधीत मोठ्या उत्साहाने भाविकांनी पुढाकार घेत धार्मिक कार्यक्रम साजरे केले. मागील ११ महिन्यांपासून नित्यनियमाने प्रवचन, भजन, अन्नदान व रात्री कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. भाविकांचा सहभाग अजूनही वाढतच आहे. वर्षभर सप्ताह अंतिम टप्प्यात आला आहे.
१५ आॅगस्ट रोजी वर्षभराच्या सप्ताहाची सांगता होणार आहे. या दिवशी फळा नगरीत जनसागर उसळणार असल्याने ग्रामस्थांनी आतापासून जय्यत तयारी सुरू केलेली आहे.
भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
(प्रतिनिधी)
रस्त्याचा प्रश्न कायमच
फळानगरीत वर्षभर सप्ताह नित्यनियमाने अकरा महिन्यांपासून सुरू आहे. या कालावधीत आजूबाजूच्या परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत आहे. पालम -फळा हा पाच कि.मी. रस्ता खराब झाल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. या रस्त्याची लोकसहभागातून डागडुजी करण्यात आली होती. परंतु शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे या रस्त्याचा प्रश्न अजूनही कायम राहिलेला आहे. याकडे तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.