धर्मगुरूंनी ‘सच्चाई’चा मार्ग दाखवावा!
By Admin | Updated: September 4, 2014 00:54 IST2014-09-04T00:45:22+5:302014-09-04T00:54:12+5:30
औरंगाबाद : धर्मगुरूंकडे समाज खूप आदराने बघतो. त्यांच्याकडून चांगल्या आचरणाची अपेक्षा असते. त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना ‘सच्चाई’चा मार्ग दाखविण्याचे काम त्यांनी करायला हवे,

धर्मगुरूंनी ‘सच्चाई’चा मार्ग दाखवावा!
औरंगाबाद : धर्मगुरूंकडे समाज खूप आदराने बघतो. त्यांच्याकडून चांगल्या आचरणाची अपेक्षा असते. त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना ‘सच्चाई’चा मार्ग दाखविण्याचे काम त्यांनी करायला हवे, असे प्रतिपादन मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष मौलाना सय्यद राबे हसनी नदवी यांनी आज येथे केले.
विख्यात इस्लामी शिक्षण संस्था ‘नदवतुल उलमा’चे प्रमुख असलेले मौलाना राबे हसनी नदवी मागील दोन दिवसांपासून औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. मंगळवारी सायंकाळी जामा मशीद येथे त्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर आज मदरशात शिक्षण घेणारे विद्यार्थी, स्थानिक धर्मगुरूंची भेट घेतली. त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की, शिक्षणामुळे प्रत्येकाची वैचारिक उंची वाढते. आपण जे काही शिक्षण घेतले आहे, त्याचा उपयोग समाजाला कसा होईल, याचा विचार केला पाहिजे. इस्लामी शिक्षणाशिवाय समाजात जे घडत आहे, त्या दृष्टीनेही शिक्षण घेणे गरजेचे आहे.
आपल्या पूर्वजांनी आपले आचरण, विचार आणि इच्छाशक्तीच्या बळावर जगावर राज्य केले. आपणही देशाची सेवा कशापद्धतीने करू शकतो, आपले योगदान असायला हवे याचा विचार केला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
त्यांच्यासोबत मौलाना खालीद नदवी गाजीपुरी, मौलाना वाजेह रशीद नदवी तसेच जामा मशीदचे प्रमुख मौलाना रियोजोद्दीन फारुकी, मोईज फारुकी, मौलाना नसीमोद्दीन मुफ्ताही, मौलाना मुजीब साहब आदींची उपस्थिती होती.