प्रवाशांना दिलासा ! ‘एसटी’ची चाके आज रात्रीपासूनच गतीमान
By संतोष हिरेमठ | Updated: November 2, 2023 21:41 IST2023-11-02T21:40:53+5:302023-11-02T21:41:17+5:30
सलग चार दिवसांपासून बंद होती लाल परीची वाहतूक

प्रवाशांना दिलासा ! ‘एसटी’ची चाके आज रात्रीपासूनच गतीमान
छत्रपती संभाजीनगर : सलग चार दिवस बंद असलेली बससेवा गुरुवारी रात्री ८ वाजेनंतर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. मध्यवर्ती बसस्थानकातून पुण्यासाठी बसेस सोडण्यात आल्या. तसेच बसस्थानकात अडकलेल्या इतर जिल्ह्यातील बसेस रवाना होत असल्याची माहिती आगार व्यवस्थापक अविनाश साखरे यांनी सांगितले.
तर सिडको बसस्थानकातून प्रारंभी पुणे, नाशिक बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले. शुक्रवारी सकाळपासून संपूर्ण बससेवा पूर्वपदावर येईल, असे आगार व्यवस्थापक संतोष घाणे यांनी सांगितले.
एसटी महामंडळाची सलग चौथ्या दिवशी, गुरुवारीही जिल्ह्यातील ७ आगारांतील बससेवा बंद राहिली. पैठण आगारातून काही बसेस धावल्या. जिल्ह्यात दिवसभरात एसटीच्या १,३४९ पैकी १,२७५ फेऱ्या रद्द झाल्या. तर दिवसभरातील ३६ लाख ६४ हजार रुपयांचे उत्पन्न बुडाले. गेल्या चार दिवसांत जवळपास २ कोटी रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी दिली.