सप्टेंबरमधील नुकसानीपोटी जालना, हिंगोली जिल्ह्यांना ४८० कोटींची मदत; अध्यादेश निघाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 15:25 IST2025-10-16T15:21:15+5:302025-10-16T15:25:02+5:30
दोन्ही जिल्ह्यांना ४८० कोटींची एकूण मदत मिळणार आहे

सप्टेंबरमधील नुकसानीपोटी जालना, हिंगोली जिल्ह्यांना ४८० कोटींची मदत; अध्यादेश निघाला
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील दोन जिल्ह्यांना सप्टेंंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी ६५ कोटींची मदत देण्याचा अध्यादेश राज्य शासनाने १५ ऑक्टोबर रोजी काढला आहे. अमरावती विभागातील ३ जिल्ह्यांना ४१५ कोटी व मराठवाड्यातील २ जिल्ह्यांना ६५ कोटी मिळून ४८० कोटी रुपयांची नुकसानभरपाई शासन देणार आहे.
मराठवाड्यातील जालना जिल्ह्याला ८३ लाख ८४ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. १८२७ शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येईल, तर हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ५ हजार १२० शेतकऱ्यांना ६४ कोटी ६१ लाख ८३ हजारांची मदत देण्यात येणार आहे. १ ते ८ ऑक्टोबरदरम्यान शासनाकडे देण्यात आलेल्या प्रस्तावानुसार मदतीचा अध्यादेश काढण्यात आला आहे. दरम्यान, शासनाने दिवाळीपूर्वी मदत शेतकऱ्यांच्या हाती पडावी, असे आदेश महसूल यंत्रणेला दिले आहेत. १४१८ कोटींचा मदतीचा पहिला टप्पा मराठवाड्यातील सात जिल्ह्यांमध्ये वितरित करणे सुरू आहे. त्यात जालना जिल्ह्याचा समावेश नव्हता.
१२ ते २८ सप्टेंबरपर्यंत झालेल्या नुकसानीचा अहवाल अद्याप शासनाकडे गेलेला नाही. त्यामुळे त्या नुकसानीची मदत अद्याप जाहीर झालेली नाही.