पावसाच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांना दिलासा; खरीप हंगामासाठी जायकवाडीतून सुटणार आवर्तन
By बापू सोळुंके | Updated: July 15, 2025 19:18 IST2025-07-15T19:17:34+5:302025-07-15T19:18:13+5:30
पावसाळा सुरू होऊन दिड महिना उलटला तरी मराठवाड्यात जोरदार पाऊस पडलेला नाही.

पावसाच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांना दिलासा; खरीप हंगामासाठी जायकवाडीतून सुटणार आवर्तन
छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पुरेसा पाऊस न पडल्याने जालना आणि परभणी जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी उद्या बुधवारी जायकवाडी प्रकल्पातून पाण्याचे आवर्तन साेडण्याचा निर्णय राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील विधानभव येथे मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यासोबत माजलगाव प्रकल्पासाठीही उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे बैठकीत ठरले.
पावसाळा सुरू होऊन दिड महिना उलटला तरी मराठवाड्यात जोरदार पाऊस पडलेला नाही. परिणामी जायकवाडी वगळता मराठवाड्यातील लघू, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पात जेमतेम जलसाठा आहे. दुसरीकडे मात्र नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस पडल्याने पैठण येथील जायकवाडी प्रकल्प ७७ टक्के भरला आहे. याशिवाय प्रकल्पाच्या उर्ध्वभागातून पाण्याची आवक सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी जायकवाडी प्रकल्प कालवा पाणी नियोजन बैठक जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी विधानभवनात झाली. या बैठकीत जालना व परभणी जिल्ह्यात पुरेसा पाऊस न झाल्याने खरीप हंगामासाठी तातडीने बुधवारीच डाव्या कालव्यातून पाण्याचे आवर्तन देण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच माजलगाव धरणासाठी प्रकल्प नियोजनाप्रमाणे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे बैठकीत ठरल्याचे कडाचे प्रशासक तथा अधीक्षक अभियंता एस.के.सब्बीनवार यांनी सांगितले.
या बैठकीला आमदार प्रकाश सोळंके, आ.हिकमत उढाण,आ. विजयसिंह पंडित,आ. राजेश विटेकर, आ. राहुल पाटील, आ.रत्नाकर गुट्टे, कडाचे मुख्य अभियंता सुनंदा जगताप, अधीक्षक अभियंता एस.के.सब्बीनवार आणि पल्लवी जगताप आदींची उपस्थिती होती.