पाणी अन् रक्तासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची वणवण; घाटी रुग्णालयातील दृश्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 19:05 IST2025-03-24T19:05:13+5:302025-03-24T19:05:28+5:30
रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी झाल्याने घाटीतील विभागीय रक्त केंद्रात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.

पाणी अन् रक्तासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची वणवण; घाटी रुग्णालयातील दृश्य
छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. रुग्णांच्या नातेवाइकांना पाण्याची बाटली घेऊन पाणी शोधावे लागत आहे. त्याबरोबरच रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी झाल्याने घाटीतील विभागीय रक्त केंद्रात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रक्तासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना खासगी रक्तपेढ्यांकडे धाव घ्यावी लागत आहे.
घाटीतील विभागीय रक्त केंद्रात दररोज किमान ५० ते ६० रक्त आणि रक्त घटकांची मागणी असते. परंतु परीक्षेचा कालावधी, वाढता उन्हाचा पारा यामुळे गेल्या काही दिवसांपासून रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा परिणाम रक्त केंद्रातील साठ्यावर होत आहे. ‘ब्लड इज नाॅट इन स्टाॅक’ असे लिहून देत रुग्णांच्या नातेवाइकांना माघारी पाठविण्याची वेळ ओढवत आहे. त्यामुळे रक्तासाठी घाटीतून खासगी रक्तपेढी गाठण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाइकांवर ओढवत आहे.
दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठीही रुग्णांच्या नातेवाइकांचे हाल होत आहे. घाटीत जागोजागी वाॅटर कूलर बसविण्यात आलेले आहे. परंतु अनेक ठिकाणी पाणी नसल्याने बाटलीबंद पाणी विकत घेण्याची अथवा रिकामी बाटली घेऊन एका वाॅर्डातून दुसऱ्या वाॅर्डात पाण्याची शोधाशोध करण्याची वेळ नातेवाइकांवर ओढवत आहे. गेल्या दोन दिवसांपासून घाटी प्रशासनाला पाण्याचे टँकरही मागवावे लागत आहेत.
रक्तदानासाठी पुढे यावे
सध्या काही प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. गेल्या दिवसांत शिबिरांचे प्रमाण कमी झाले आहे. गरजू रुग्णांसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे.
- डाॅ. भारत सोनवणे, विकृतिशास्त्र विभागप्रमुख, घाटी
प्रत्येक वाॅर्डात वाॅटर कूलर
प्रत्येक वाॅर्डात वाॅटर कूलर आहेत. त्या स्थितीचा आढावा घेतला जाईल. सध्या पाण्याचीही कमतरता जाणवत आहे. रुग्णालयासाठी टँकर मागविण्यात येत आहे.
- डाॅ. सुरेश हरबडे, वैद्यकीय अधीक्षक, घाटी