‘मिसाईल मॅन’चा शहराशी ऋणानुबंध
By Admin | Updated: July 28, 2015 01:21 IST2015-07-28T00:48:00+5:302015-07-28T01:21:55+5:30
शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद भारतीय क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे जनक, मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा औरंगाबाद शहराशी ऋणानुबंध तसा जुनाच.

‘मिसाईल मॅन’चा शहराशी ऋणानुबंध
शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद
भारतीय क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे जनक, मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा औरंगाबाद शहराशी ऋणानुबंध तसा जुनाच. १९९८ पासूनचा. देशासाठी अग्निबाण तयार करणाऱ्या या शिक्षक शास्त्रज्ञाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने डी. लिट. ही पदवी देऊन १९९९ मध्ये गौरविले होते. त्यानंतर तब्बल १५ वर्षांनी या विद्यापीठात पदवीदान समारंभाच्या निमित्ताने त्यांचे पाऊल पडले.
भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रम रोहिणी या नावाने सुरू झाला व पृथ्वी, अग्नी, नाग, आकाश ही क्षेपणास्त्रे तयार करीत दिवसेंदिवस अधिक विकसित होत गेला. शास्त्रज्ञ म्हणून नावलौकिक प्राप्त डॉ. कलाम यांना मानद डॉक्टरेट देण्याचा ठराव कुलगुरू डॉ. शिवराज नाकाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने २८ आॅक्टोबर १९९८ रोजी घेतला होता. कार्यबाहुल्यामुळे डॉ. कलाम यांना औरंगाबादला येणे शक्य न झाल्यामुळे २६ सप्टेंबर १९९९ रोजी विद्यापीठाच्या समितीने दिल्लीतील त्यांच्या नॉर्थ ब्लॉक येथील कार्यालयात जाऊन हा सन्मान त्यांना प्रदान केला. त्या समितीत प्रा. प्रदीप दुबे, प्रा. दाबके, प्रा. डॉ. शिवशंकर मिश्रा, डॉ. पी. वाय. कुलकर्णी, डॉ. एस. जी. गुमास्ते यांचा समावेश होता. तेव्हापासूनच डॉ. कलाम यांचा औरंगाबादशी ऋणानुबंध जोडल्या गेला व तो शेवटपर्यंत कायम राहिला. देशाच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यानंतर २४ सप्टेंबर २००४ रोजी डॉ. कलाम यांनी औरंगाबादला भेट दिली होती. वोक्हार्ट कंपनीच्या बायोटेक पार्कच्या उद्घाटनानिमित्त ते औरंगाबादेत आले होते. स्पर्धेच्या या युगात ज्ञानसमृद्ध समाज निर्माण करण्याची जबाबदारी शास्त्रज्ञांची असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले होते. औद्योगिक समाज, माहितीयुक्त समाज आपण निर्माण केला. आता ज्ञानयुक्त समाज निर्माण करा, असे आवाहन त्यांनी वोक्हार्टच्या १४० शास्त्रज्ञांशी संवाद साधताना केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला कुलगुरू म्हणून डॉ. विजय पांढरीपांडे हे शास्त्रज्ञ लाभल्यानंतर त्यांनी २०११ पासून अनेकदा माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना विद्यापीठात येण्याचे निमंत्रण दिले. व्यस्ततेमुळे विद्यापीठाचे निमंत्रण स्वीकारण्यासाठी डॉ. कलाम यांना दोन वर्ष लागली. विद्यापीठाच्या ५३ व्या पदवीदान समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते १० मार्च २०१३ रोजी विद्यापीठात आले. त्यांना पाहण्यासाठी हजारो विद्यार्थ्यांनी गर्दी केली. ‘मला भाषण करणे जमणार नाही, पण उपग्रहाला कवेत घेऊन ताशी २५ हजार कि. मी. वेगाने जाणारा अग्निबाण बनवायला सांगा, ते मला जमेल’, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या उपस्थितीत असे सांगणारे डॉ. कलाम यांनी यावेळेस विद्यार्थ्यांमध्ये जोश व उत्साह निर्माण करण्यासह संशोधनाची दिशा स्पष्ट करणारे मार्गदर्शन केले. शिक्षकांना संशोधनाविषयी प्रेम असेल तर उपयुक्त संशोधन होते, असे सांगत त्यांनी शिक्षकांचे हळूच कानही टोचले होते. विद्यापीठात येण्यापूर्वी त्यांनी कुलगुरू पांढरीपांडे यांच्याशी फोनवर संपर्क साधून विद्यापीठात शिकविले जाणारे विषय, संशोधन, कोणत्या विषयात जास्त संशोधन होते, अशी इत्थंभूत माहिती घेतली होती. त्यांच्या भाषणातून हे बारकावेही स्पष्ट दिसत होते.
२०१३ नंतर पुन्हा दोन वर्षांनी म्हणजे २०१५ च्या प्रारंभीच २९ जानेवारी रोजी डॉ. कलाम पुन्हा औरंगाबादेत आले होते. स्टरलाईट कंपनीतील एका कार्यक्रमाला उपस्थित राहून नंतर ते महात्मा गांधी मिशनच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमालाही उपस्थित राहिले होते. ही त्यांची औरंगाबादची शेवटची भेट ठरली.