अनधिकृत बांधकामांच्या रजिस्ट्रीला चाप; NAसह नकाशा, गुंठेवारी नियमितीकरणानंतरच खरेदी-विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 11:48 IST2024-12-12T11:48:22+5:302024-12-12T11:48:45+5:30
बोगस एन-ए प्रकरणी नगररचना संचालकांपर्यंत तक्रारी गेल्या. परंतु, त्यात काहीही निर्णय न झाल्यामुळे यात सक्रिय असलेल्या रॅकेटचे फावते आहे.

अनधिकृत बांधकामांच्या रजिस्ट्रीला चाप; NAसह नकाशा, गुंठेवारी नियमितीकरणानंतरच खरेदी-विक्री
छत्रपती संभाजीनगर : एनए बोगस असणे, गुंठेवारी नियमितीकरणाचे प्रमाणपत्र नसणे, नगररचना विभागाच्या नकाशांची पूर्तता नसणे. महापालिका, महानगर विकास नियोजन प्राधिकरणाकडील मंजुरी नसतानाही मुद्रांक विभागात अनधिकृत प्लॉट व बांधकाम झालेल्या मालमत्तांची खरेदी-विक्रीच्या अनुषंगाने रजिस्ट्री होत आहे. शहरातील महाभागांकडून असे प्रकार होत असल्यामुळे मुद्रांक विभागाने दुय्यम उपनिबंधकांसाठी एक परिपत्रक जारी केले आहे. मनपा, प्राधिकरण, नगररचना विभागाचे अधिकृत दस्त नसतील, तर नोंदणी करू नये, असे आदेश मुद्रांक जिल्हाधिकारी विवेक गांगुर्डे यांनी दिले आहेत.
मुद्रांक अधिकाऱ्यांनी पत्रात म्हटले आहे, शहरातील काही बिल्डर महापालिका, महानगर विकास प्राधिकरण यांच्याकडून बांधकामाचा नकाशा मंजूर न करता नोंदणी अधिनियम १९०८ मधील तरतुदीनुसार खरेदी-विक्री हस्तांतरणाचे पेपर्स सादर करतात. त्यानुसार मुद्रांक कार्यालयात रजिस्ट्री व इतर दस्ताची नाेंदणी केली जाते. नगररचना विभागाच्या नियमानुसार बांधकाम न झाल्यामुळे अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढू शकतात.
यापुढे महापालिका, छावणी, प्राधिकरणांच्या कोणत्याही प्रकारच्या क्षेत्रात नगरनियोजन करण्यास व बांधकाम परवानगी देण्यास सक्षम असणाऱ्या अधिकाऱ्याने मंजूर केलेल्या बांधकाम नकाशाप्रमाणे केलेल्या बांधकामाव्यतिरिक्त इतर बांधकामाचे हस्तांतरण दस्त सक्षम अधिकाऱ्याने शासनाच्या अधिसूचनेनुसार गुंठेवारी अधिनियमांच्या तरतुदीनुसार बांधकाम नियमित हवे. त्याचे प्रमाणपत्र व मंजूर नकाशा संबंधिताने दस्तासोबत जोडून दिले तर मुद्रांक विभागाने नोंदणीची कार्यवाही करावी.
सगळे पेपर तपासा, चार महिन्यांची मुदत द्या
नगररचना, मनपा, कटकमंडळे, प्राधिकरणाने मंजूर केलेला बांधकाम नकाशा किंवा गुंठेवारी नियमित केल्याचा दाखला व मंजूर नकाशा दस्तासोबत जोडला नसेल तर दस्त कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी परत करावेत. तेथून पुढे चार महिन्यांत संबधित अधिकाऱ्याची परवानगी घेऊन दस्त नोंदणीसाठी दाखल करता येता येतील, असे आदेश मुद्रांक अधिकाऱ्यांनी दुय्यम उपनिबंधकांना दिले आहेत.
प्राधिकरणात काय सुरू आहे?
महानगर विकास प्राधिकरणात ३१३ गावांचा समावेश आहे. झालर क्षेत्रातील २४ गावांत सिडको प्राधिकरण आहे. या दोन्ही प्राधिकरणांमध्ये अनधिकृत बांधकामे झालेली आहेत. या बांधकामांच्या रजिस्ट्रीदेखील झाल्याचा मुद्दा तत्कालीन विभागीय आयुक्तांनी निदर्शनास आणून दिला होता.
महापालिका हद्दीत काय स्थिती?
गुंठेवारी वसाहतींमधील बांधकामे गुंठेवारी नियमितीकरण न करता विक्री होत आहेत. त्यामुळे बांधकाम परवानगी न घेता जुनी घरे पाडून नवीन बांधकामे होत आहेत. गुंठेवारीला पळवाट काढून सातबाऱ्याच्या आधारे रजिस्ट्री होत असल्याच्या तक्रारी अप्पर तहसीलमध्ये मध्यंतरी आले होते. गुंठेवारीतील मालमत्तांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार मुद्रांक पेपरवरच होत आहेत. जुन्या मालकाने घर विकल्यास ते नियमित होत नाही, तोवर नवीन मालकाचे नाव मनपा दप्तरी लागत नाही. यासाठी खर्चाचा भुर्दंड नवीन मालकाला बसेल.
बोगस एन-एचा सुळसुळाट
बोगस एन-ए च्या आधारे रजिस्ट्री केली जात आहे. त्या आधारे बांधकाम परवानगी मिळते. बोगस एन-ए प्रकरणी नगररचना संचालकांपर्यंत तक्रारी गेल्या. परंतु, त्यात काहीही निर्णय न झाल्यामुळे यात सक्रिय असलेल्या रॅकेटचे फावते आहे. परिणामी, अनधिकृत बांधकामे थांबविण्यात प्रशासनाच्या सर्व यंत्रणा हतबल आहेत.