आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत नोकरभरती करू नये; मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 18:55 IST2021-01-09T18:51:34+5:302021-01-09T18:55:59+5:30
Maratha Reservation : मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे समाजाला न्याय देऊ शकत नाहीत. यामुळे त्यांना पदावरून हटवून जाणकार व्यक्तीला आरक्षण समितीचे अध्यक्ष करा

आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत नोकरभरती करू नये; मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी
औरंगाबाद: सर्वोच्च न्यायालय जोपर्यंत मराठा आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत राज्य सरकारने कोणतीही नोकरभरती करू नये, अशी एकमुखी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे आयोजित एल्गार परिषदेत आज येथे करण्यात आली.
मराठा क्रांति ठोक मोर्चातर्फे शनिवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात एल्गार परिषद घेण्यात आली. परिषदेच्या सुरवातीला शाहीर सुरेश जाधव यांचा पोवाड्याचा कार्यक्रम झाला. यावेळी परिषदेचे संयोजक रमेश केरे पाटील म्हणाले की, मराठा समाजाने ५४ मूकमोर्चे काढून एसईबीसी आरक्षण मिळविले. मात्र या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली. यानंतर उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या मराठा उमेदवारांच्या भवितव्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले. मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे समाजाला न्याय देऊ शकत नाहीत. यामुळे त्यांना पदावरून हटवून जाणकार व्यक्तीला आरक्षण समितीचे अध्यक्ष करा , अशी मागणी यावेळी करण्यात आली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटीचा निधी द्यावा. कोपर्डीच्या निर्भयाला न्याय देण्यासाठी तातडीने आरोपीना फासांवर लटकविण्यात यावे, यासह अन्य मागण्यासाठी मराठा तरुण स्वस्थ बसणार नाही, असे त्यांनी नमूद केले.