महानगरपालिकेची भरती प्रक्रिया रद्द
By Admin | Updated: July 28, 2014 01:03 IST2014-07-28T00:50:15+5:302014-07-28T01:03:26+5:30
औरंगाबाद : महापालिकेची १२४ कर्मचारी भरती प्रक्रिया रद्द करण्यात येणार आहे.

महानगरपालिकेची भरती प्रक्रिया रद्द
औरंगाबाद : महापालिकेची १२४ कर्मचारी भरती प्रक्रिया रद्द करण्यात येणार आहे. मराठा आणि मुस्लिम समाजाला राज्य शासनाने आरक्षण दिल्यामुळे या आरक्षणाचा निकष लावून नव्याने कर्मचारी भरतीसाठी जाहिरात देण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
२०११ मध्ये पालिकेने आस्थापनेवरील रिक्त जागांसाठी कर्मचारी भरती करण्यासाठी जाहिरात दिली होती. त्या जाहिरातीमध्ये द्वितीय, तृतीय, चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात येणार होती. यामध्ये प्रामुख्याने क्लार्क संवर्गाची जास्त पदे होती. तसेच लाईनमन व चतुर्थ श्रेणीतील पदांचाही त्या भरतीमध्ये समावेश होता.
आरक्षण कसे असेल....
मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यापूर्वी ५१ टक्क्यांत अनुसूचित जाती, जमाती, एन.टी., एस.सी., ओ.बी.सी. या प्रवर्गांचा समावेश होता.
आता त्यामध्ये २१ टक्के मराठा, मुस्लिम समाजाचे आरक्षण टाकण्यात येईल. त्यामुळे कर्मचारी भरतीतील १२४ पैकी ७२ टक्के पदे ही आरक्षणातून भरली जातील. ते आरक्षण कसे असावे, यासाठी पालिकेने शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. येत्या काही दिवसांमध्ये शासनाकडून त्याबाबत मार्गदर्शन मिळाल्यास पालिकेत कर्मचारी भरतीचा मार्ग खुला होईल.
किती अर्ज आले होते...
२०११ मध्ये पालिकेने जाहिरात देऊन इच्छुकांना आवाहन केले होते. सुमारे ११ हजार अर्ज पदांसाठी आले होते. नोव्हेंबर २०११ पासून मार्च २०१२ पर्यंत लेखी परीक्षा घेणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. खुल्या प्रवर्गासाठी २०० रुपयांचा आणि आरक्षित प्रवर्गासाठी १०० रुपयांचा डी. डी. मनपाने घेतला होता.
१५ लाख रुपयांचे काय....
अर्ज दाखल करताना उमेदवारांना आरक्षण निकषानुसार पालिकेच्या नावे डी. डी. देण्याची अट घालण्यात आली होती. पालिकेला अर्ज स्वीकृतीतून १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. ती रक्कम तीन वर्षांपासून पालिकेने वापरली आहे. या पैशांचे व्याज उमेदवारांना मिळणार काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
आता अनेक उमेदवारांना अर्ज भरल्याचेही आठवत नाही. त्यांच्याकडे अर्ज भरल्याची ओ.सी.देखील नसणार. त्यामुळे ती रक्कम परत मिळेल, अशी शक्यता नाही.
भरतीवरून अनेक वाद
१२४ कर्मचारी भरती प्रक्रियेवरून सर्वसाधारण सभेत अनेकदा वाद झाले. नोकरी लावून देतो म्हणून अनेकांनी उमेदवारांकडून टोकण रक्कमदेखील उकळली आहे.
आरक्षणामुळे भरती प्रक्रियाच रद्द होणार असल्यामुळे उमेदवारांनी दिलेली रक्कम दलाल परत करणार काय, असा प्रश्न आहे.