वसुली एजंटचे एका दिवसात ७० कॉल; दिराने घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी शिक्षिकेला फोनवरून धमक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 12:59 IST2021-01-01T12:54:48+5:302021-01-01T12:59:54+5:30

या प्रकारामुळे या दाम्पत्याला नैराश्य आल्याने त्यांनी पोलिसांसमोर आज आत्महत्येचा विचार बोलून दाखविला.

Recovery agent's bullying; Threats to the teacher over the phone to recover the loan taken by Dira | वसुली एजंटचे एका दिवसात ७० कॉल; दिराने घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी शिक्षिकेला फोनवरून धमक्या

वसुली एजंटचे एका दिवसात ७० कॉल; दिराने घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी शिक्षिकेला फोनवरून धमक्या

ठळक मुद्देआरबीएल बँकेचे वसुली एजंट शिक्षिकेच्या शाळेतही करतात रोज फोनकर्जासाठी ना जामीनदार, ना काही संबंध तरीही वसुली एजंट देतात त्रास

औरंगाबाद : दिराने घेतलेल्या कर्जासाठी ना जामीनदार, ना काही संबंध तरीही आरबीएल बँकेचे वसुली एजंट शिक्षिका आणि तिच्या पतीला रात्रंदिवस फोन कॉल करून शिवीगाळ आणि धमक्या देत आहेत. पोलिसांत तक्रार करूनही आरोपींवर कोणताही परिणाम झाला नाही. उलट त्यांच्या शाळेतील मुख्याध्यापकापासून ते शिपायापर्यंत सर्वांना फोन करून बदनामी करीत सुटले आहेत. या प्रकारामुळे दाम्पत्याने आत्महत्येचा विचार पोलिसांसमोर बोलून दाखविल्याने खळबळ उडाली आहे.

गारखेडा परिसरातील रश्मी मकवाना या शहरातील नामांकित शाळेत शिक्षिका तर त्यांचे पती कंपनीत मोठ्या पदावर आहेत. २० वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले. तेव्हापासून त्यांच्या सासरच्या मंडळीने त्यांच्याशी संबंध तोडले. आरबीएल बँकेच्या वसुली प्रतिनिधींनी कुठून तरी मकवाना यांचा मोबाइल क्रमांक मिळवून सतीश तुमचा दीर आहे का? अशी विचारणा केली. त्यांनी होय उत्तर दिल्यापासून त्यांना आणि त्यांचे पती सुरेश वाळोंद्रे यांना रोज विविध क्रमांकावरून फोन करून धमक्या देत आहेत. त्यांनी त्यांचे फोन नंबर ब्लॉक केल्यावर मकवाना यांच्या शाळेच्या रिसेप्शन, मुख्याध्यापक, अकाउंटंट ते शिपायापर्यंत सर्वांना फोन करून त्यांची बदनामी करीत आहेत. यामुळे सुरेश वाळोंद्रे यांनी पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. फोन करणाऱ्यांना संपर्क साधला असता त्यांच्याशीही अरेरावी केली. या प्रकारामुळे या दाम्पत्याला नैराश्य आल्याने त्यांनी पोलिसांसमोर आज आत्महत्येचा विचार बोलून दाखविला.

एका दिवसात ७० कॉल
वसुली एजंटांनी आमच्या शाळेच्या स्वागत कक्षाला दिवसभरात ७० कॉल केले. शिवाय दिराने घेतलेल्या कर्जाशी माझा आणि माझ्या पतीचा कोणताच संबंध नाही, असे असताना आम्हाला रात्रंदिवस अश्लील शिवीगाळ करून कर्ज वसुलीकरिता ते धमकावत आहेत.
- रश्मी मकवाना - वाळोंद्रे, तक्रारदार.

Web Title: Recovery agent's bullying; Threats to the teacher over the phone to recover the loan taken by Dira

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.