जप्त केलेल्या वाळूचे परस्पर हस्तांतरण
By Admin | Updated: June 27, 2014 00:27 IST2014-06-27T00:24:46+5:302014-06-27T00:27:34+5:30
कळंब : महसूल विभागाने पंचनामा केलेला असतानाही या वाळूसाठ्याचे परस्पर हस्तांतरण केल्याप्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त केलेल्या वाळूचे परस्पर हस्तांतरण
कळंब : शेतामध्ये अवैधरीत्या वाळूसाठा केल्याचे निदर्शनास आल्यानंतर महसूल विभागाने पंचनामा केलेला असतानाही या वाळूसाठ्याचे परस्पर हस्तांतरण केल्याप्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील खोंदला येथील आबासाहेब मुळीक यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या सर्वे क्र. ४ मधील शेतजमिनीत जवळपास २८ ब्रास वाळूचा साठा अवैधरीत्या करण्यात आला होता. या साठ्याचा ईटकूर महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी पांडुरंग श्रीपती आवटे यांनी स्थळपंचनामा करून आपला अहवाल तालुका प्रशासनास सादर केला होता.
याप्रकरणी तहसीलदारांनी दंड ठोठावून वाळू साठा जप्त करण्याचे आदेश दिले होते. परंतु, याबाबत मुळीक यांनी सदर वाळू विहिरीच्या बांधकामासाठी हस्तगत केली असल्याने दंड माफ करावा, यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले होते. तर उपविभागीय अधिकाऱ्यांनी सदर प्रकरण पुनर्विलोकनासाठी तहसीलदारांकडे परत पाठविले होते. याबाबत तहसीलदारांनी सुनावणी घेऊन अवैधरित्या वाळू साठा करणे व पंचनामा झाला असतानाही तो परस्पर हस्तगत करणे आदी कारणावरून आबासाहेब मुळीक यांच्यावर २ लाख ३० हजारांचा दंड आकारून पुढील कार्यवाहीसाठी ईटकूर येथील मंडळ अधिकाऱ्यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमले. यावरून कळंब पोलिस ठाण्यात मंडळ अधिकारी पंढरीनाथ श्रीपती आवटे यांच्या फियादीवरून आबासाहेब मुळीक याच्याविरूध्द कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)