मैत्रीमागील वाईट हेतू कळला, तरुणीने दुरावा ठेवला; संतापलेल्या तरुणाने रस्त्यात गाठले अन्...
By बापू सोळुंके | Updated: April 8, 2023 18:25 IST2023-04-08T18:25:01+5:302023-04-08T18:25:54+5:30
साथ सोडताच तरूणीस केली मारहाण; पोलिसांनी नोंदविला गुन्हा

मैत्रीमागील वाईट हेतू कळला, तरुणीने दुरावा ठेवला; संतापलेल्या तरुणाने रस्त्यात गाठले अन्...
छत्रपती संभाजीनगर: खाजगी कंपनीत एकत्र काम करीत असताना तरूणीसोबत मैत्री केली. मैत्रीमागे त्याचा वाईट हेतूने असल्याचे तिच्या लक्षात येताच त्याने त्याची मैत्री तोडली. याचा राग आल्याने तरूणाने तिला गाठून विनयभंग करीत मारहाण केल्याची घटना न्यु हनुमाननगर येथे ६ एप्रिल रोजी रात्री घडली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तरूणाविरोधात विनयभंग, मारहाण केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.
कृष्णा विष्णू अहिरे (२५,रा. मिलिंद कॉलनी, खडकेश्वर)असे आरोपीचे नाव आहे. या घटनेविषयी पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार पीडिता आणि आरोपी एका खाजगी कंपनीत एकत्र काम करीत होते. यादरम्यान त्यांच्यात मैत्री झाली. तेव्हा त्यांनी एकत्र फोटोही काढले होते. दरम्यान तिने तो जॉब सोडला आणि त्याच्यासोबत बोलणेही बंद केले. ही बाब आरोपी कृष्णाला खटकली. तिला फोन करून जवळीक निर्माण करण्यासाठी तो तिचा पाठलाग करायचा. हेतू चांगला नसल्याचे पीडितेच्या लक्षात येताच त्याला स्पष्ट शब्दात सुनावले. मात्र यानंतरही तो तिचा पाठलाग करीत होता.
६ एप्रिल रोजी रात्री ती न्यू हनुमाननगर येथे असताना आरोपीने तिला गाठले आणि तिचा विनयभंग केला. पिडितेने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच आरोपीने तिला मारहाण आणि शिवीगाळ केली. दोघांचे छायाचित्रे समाजमाध्यमावर व्हायरल करण्याची व जीवे मारण्याची धमकी त्याने दिली. याप्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेने शेवटी कृष्णाविरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पोलीस उपनिरीक्षक शेख या घटनेचा तपास करीत आहेत.