मतदानासाठी नागरिक सज्ज
By Admin | Updated: October 15, 2014 00:48 IST2014-10-15T00:44:54+5:302014-10-15T00:48:19+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या बुधवारी मतदान होणार आहे.

मतदानासाठी नागरिक सज्ज
औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या बुधवारी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. मतदानासाठी सर्व निवडणूक कर्मचारी आजच मतदान यंत्र व इतर साहित्य घेऊन आपापल्या केंद्रांवर दाखल झाले. उद्या जिल्ह्यात २४ लाख ८८ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
सर्व नऊ मतदारसंघांत एकूण १५६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्वाधिक ३० उमेदवार औरंगाबाद पूर्व मतदारसंघात आहेत, तर सर्वात कमी १२ उमेदवार कन्नड मतदारसंघात आहेत. जिल्हाभरात एकूण २७४७ मतदान केंदे्र असणार आहेत. या केंद्रांवर सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी १६ हजार ८०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत, तसेच सहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय सीआरपीएफ, एसआरपी, सीआयएसएफच्या १२ कंपन्याही दाखल झाल्या आहेत. मतदान उद्या होणार असले तरी त्यासाठी सर्व निवडणूक कर्मचारी आजच आपापल्या केंद्रावर पोहोचले. तत्पूर्वी, प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयात सकाळी निवडणूक कर्मचारी प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम), व्हीव्हीपॅट मशीन आणि इतर मतदान साहित्य वाटप करण्यात आले. त्यानंतर दुपारी १२ वाजेनंतर निवडणूक कर्मचारी नेमून दिलेल्या केंद्रांकडे बस आणि जीपमधून रवाना होण्यास सुरुवात झाली. दुपारी २ वाजेपर्यंत सर्व कर्मचारी मतदारसंघाच्या कार्यालयातून बाहेर पडले.
यातील बहुतेक कर्मचारी मतदान साहित्यासह दुपारीच आपापल्या केंद्रांवर पोहोचले. दूरच्या अंतरावरील कर्मचारीही सायंकाळपर्यंत केंद्रांवर दाखल झाले. निवडणूक कर्मचाऱ्यांसोबत सर्व मतदान केंद्रांवर पोलीस कर्मचारीही आजच पोहोचले. प्रत्येक केंद्रात एक पोलीस कर्मचारी तैनात असणार आहे. याशिवाय मतदान केंद्रांबाहेरही मोठ्या प्रमाणावर पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत.