योजनेतील रुग्णालयांच्या संख्येत झपाट्याने वाढ; रुग्णांवर उपचारासाठी ‘शर्यत’

By संतोष हिरेमठ | Updated: August 25, 2025 20:20 IST2025-08-25T20:20:20+5:302025-08-25T20:20:40+5:30

दोन वर्षांत ७० हजार रुग्णांवर ४३२ कोटींचे उपचार

Rapid increase in the number of hospitals under the scheme; 'race' for treatment of patients | योजनेतील रुग्णालयांच्या संख्येत झपाट्याने वाढ; रुग्णांवर उपचारासाठी ‘शर्यत’

योजनेतील रुग्णालयांच्या संख्येत झपाट्याने वाढ; रुग्णांवर उपचारासाठी ‘शर्यत’

छत्रपती संभाजीनगर : एक काळ होता की, योजनेंतर्गत उपचार करण्यात खासगी रुग्णालये फारशी रुची दाखवत नसत. मात्र, आता योजनेेंतर्गत उपचार करणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एकत्रित आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार करणाऱ्या रुग्णालयांची संख्या दीड वर्षात दुपटीने वाढली आहे. ही संख्या आणखी वाढणार आहे. या योजनेत गेल्या दोन वर्षांत सुमारे ७० हजार रुग्णांवर ४३२ कोटींचे उपचार करण्यात आले.

योजनेत मोफत उपचार होत असल्याने गरीब व गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणावर मदत होत असून, कोट्यवधी रुपयांचे उपचार मोफत योजनेतून केले जात आहेत. हृदयविकार, कर्करोग, मूत्रपिंड विकारांसह १ हजार ३५६ प्रकारचे उपचार, शस्त्रक्रिया योजनेंतर्गत उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांसोबत अनेक खासगी रुग्णालयेही या योजनेत सामील झाली आहेत.

अशी वाढली योजनेतील रुग्णालये
- जानेवारी २०२४ मध्ये योजनेत उपचार करणारी ३८ रुग्णालये होती.
- मार्च २०२५ मध्ये रुग्णालयांची ही संख्या वाढून ६५ वर आली.
- ऑगस्ट २०२५ मध्ये आता एकूण ८२ रुग्णालये योजनेंतर्गत उपचार करत आहेत.

१८२ रुग्णालयांचे लक्ष्य
जिल्ह्यात ५०९ खासगी रुग्णालये आहेत. यातील किमान १८२ रुग्णालये योजनेची अंगीकृत रुग्णालये करण्याचे लक्ष्य आरोग्य यंत्रणेने ठेवले आहे.

योजनेत उपचाराची स्थिती: 
१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ - ३१ हजार ६६० रुग्णांनी ६६ हजार ७५५ शस्त्रक्रिया व विविध उपचारांचा लाभ घेतला.
- यासाठी १९२ कोटी ६ लाख ४८ हजार १८१ रुपयांची मंजुरी देण्यात आली.

१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ - ३९ हजार २९६ रुग्णांनी ८० हजार ३०० शस्त्रक्रिया व विविध उपचारांचा लाभ घेतला.
- यासाठी २४० कोटी ८३ लाख ७२ हजार ६१७ रुपयांची मंजुरी देण्यात आली.

अर्ज आल्यानंतर रुग्णालयांची पाहणी
एकत्रित आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचे अंगीकृत रुग्णालय होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार अर्ज येणाऱ्या रुग्णालयांची जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व अधिकाऱ्यांकडून पाहणी करून पुढील प्रक्रिया केली जाते. सरकारी रुग्णालयांमध्ये योजनेतील अंगीकृत रुग्णालयांची यादी लावण्यावर भर दिला जात आहे.
- डाॅ. दयानंद मोतीपवळे, सहायक संचालक (वैद्यकीय), आरोग्य विभाग

Web Title: Rapid increase in the number of hospitals under the scheme; 'race' for treatment of patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.