Raosaheb Danve: "हे तर जुम्मे के जुम्मे सरकार...", रावसाहेब दानवेंकडून सरकारचं नामकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 20:01 IST2022-05-23T19:55:49+5:302022-05-23T20:01:51+5:30
"आमच्या काळात शहरासाठी समांतर पाणी पुरवठा योजना मंजूर केली. या सरकारने योजनेचे 1680 कोटी लुबाडले."

Raosaheb Danve: "हे तर जुम्मे के जुम्मे सरकार...", रावसाहेब दानवेंकडून सरकारचं नामकरण
औरंगाबाद: शहरातील भीषण पाणी टंचाईचा सामना करत असलेल्या औरंगाबादकरांचे प्रश्न मांडण्यासाठी भाजपने आज भव्य जल आक्रोश मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि भाजपचे अनेक मोठे नेते उपस्थित होते. यावेळी सभेला संबोधित करताना रावसाहेब दानवेंनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारचे नवीन नामकरणही केले.
'जुम्मे के जुम्मे सरकार...'
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला दानवे म्हणाले की, "पाणी मिळता का..?किती दिवसाला मिळतं..?" यावर लोकांनी आठ दिवसाला मिळतं, असे सांगितलं. त्यानंतर रावसाहेब दानवेंनी या सरकारचं नवं नाव 'जुम्मे के जुम्मे' सरकार ठेवलं. दानवे म्हणाले की, "हे सरकार अमर, अकबर आणि अँथनीचं सरकार आहे. हे सरकार कधीच सोबत बसत नाहीत, जनतेच्या हिताचा निर्णय घेत नाही. राज्यातला कोणता प्रश्नही सोडवत नाही. यांना जे जमत नाही, त्याचं खापर केंद्रावर फोडतात."
संबंधित बातमी- "यांचे मंत्री जेलात अन् मुख्यमंत्री घरात", रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
"1680 कोटी कुठे गेले"
दानवे पुढे म्हणाले की, "शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोठा आहे. आमच्या सरकारच्या काळात समांतर पाणी पुरवठा योजना मान्य झाली होती. ही योजना यांच्या भानगडीमुळे बंद झाली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अतुल सावे, हरीभाऊ बागडे यांनी 1680 कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर करुन घेतली. सरकार बदलले, युती भाजप सेनेची होती आणि या लोकांनी दुसऱ्याशी संगनमत केलं. लोकांनी आम्हाला मतदान केलं, पण आमची मतं चोरीला गेली. चोर सापडला, पण चोराला शिक्षा आता सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात द्यायची आहे. याची सुनावणी तुमच्या दराबारात सुरू आहे," असं दानवे म्हणाले.