रावसाहेब दानवे, आ.नारायण कुचेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची रुग्णालयात जाऊन भेट
By बापू सोळुंके | Updated: November 5, 2023 19:20 IST2023-11-05T19:20:11+5:302023-11-05T19:20:47+5:30
अंबादास दानवे, उदयसिंग राजपूत आणि विभागीय आयुक्तांनीही केली विचारपूस.

रावसाहेब दानवे, आ.नारायण कुचेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची रुग्णालयात जाऊन भेट
छत्रपती संभाजीनगर : शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे, कन्नडचे आ. उदयसिंग राजपूत, माजी आ. नामदेव पवार आणि विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी रविवारी त्यांची भेट घेतली. केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि बदनापुरचे आमदार नारायण कुचे यांनीदेखील जरांगेंची भेट घेतली. केंद्रीय मंत्री दानवे आणि कुचे हे रविवारी रात्री ७ वाजता रुग्णालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला. शिवाय डॉक्टरांकडूनही त्यांच्या प्रकृतीची माहिती जाणून घेतली
यासोबतच राज्यातील विविध जिल्ह्यांतून सुमारे अडीच ते तीन हजार नागरिक जरांगे यांच्या भेटीसाठी रुग्णालयात आले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी (जि.जालना) येथे सलग नऊ दिवस बेमुदत उपोषण केल्यामुळे जरांगे यांची प्रकृती खालावली होती. उपोषण स्थगित केल्यानंतर त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मंत्री, आमदार, आजी, माजी खासदार आणि नागरिक रुग्णालयात गर्दी करीत आहेत. शनिवारी सकाळी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेतली. रविवारी सकाळी आ.अंबादास दानवे, आ. उदयसिंग राजपूत, माजी आ. नामदेव पवार आणि विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. राज्य सरकार आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने केलेल्या कामाची माहिती त्यांनी जरांगे यांना दिली. यासोबतच राज्यातील विविध जिल्ह्यांतून सुमारे अडीच ते तीन हजार नागरिक रविवारी दिवसभरात त्यांच्या भेटीला आले होते.
वडिलांसह पत्नी आणि मुलीची भेट
रुग्णालयात उपचार घेत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांचे वडील, पत्नी आणि तीन मुली रुग्णालयात आल्या होत्या. दिवसभर ते सर्व जण रुग्णालयात होते. मनोज यांनी प्रकृती सांभाळून समाजसेवा करावी, असे त्यांचे वडील म्हणाले.
मराठा समाजाला दिलेला शब्द शासनाने पाळावा- दानवे
मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात दिलेले आश्वासन सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावे, जरांगे पाटील यांच्याप्रमाणेच आम्हीही मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची प्रतीक्षा करीत असल्याचे आ. दानवे यांनी सांगितले. ज्याप्रमाणे जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा लढा उभा केला, त्यास तोड नसल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.