कर बुडवणाऱ्या ३२१ कारखान्यांविरोधात रांजणगाव ग्रामपंचायतीची जप्ती मोहीम सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 14:20 IST2018-02-16T14:20:01+5:302018-02-16T14:20:27+5:30
थकीत करवसुलीसाठी रांजणगाव ग्रामपंचायतीने गुरुवारपासून जप्ती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत पहिल्याच दिवशी १० कारखान्यांकडून जवळपास १४ लाखांचा कर वसूल करण्यात ग्रामपंचायतीला यश आले.

कर बुडवणाऱ्या ३२१ कारखान्यांविरोधात रांजणगाव ग्रामपंचायतीची जप्ती मोहीम सुरु
औरंगाबाद : थकीत करवसुलीसाठी रांजणगाव ग्रामपंचायतीने गुरुवारपासून जप्ती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत पहिल्याच दिवशी १० कारखान्यांकडून जवळपास १४ लाखांचा कर वसूल करण्यात ग्रामपंचायतीला यश आले.
मोहिमेच्या पहिल्याच दिवशी ग्रामपंचायतीने १० कारखानदारांकडून १३ लाख ८७ हजार ९१७ रुपयांचा कर वसूल केला. या मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायतीचे कर्मचारी रमेश जाधव, सिद्धेश्वर मुळे, किशोर काळवणे, गणेश गायके, दीपक पंडित, बाळू कु-हाडे, अर्जुन गवळी आदींनी कारखान्यात जाऊन थकीत कर वसूल केला. ही मोहीम पंधरा दिवस सुरूराहणार असून, ३२१ कारखान्यांकडून ४ कोटी ५१ लाखांचा कर वसूल करण्यात येणार आहे, ग्रामविकास अधिकारी एस. एन. रोहकले यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात असणार्या ६५८ कारखान्यांपैकी ३३१ कारखान्यांकडे ग्रामपंचायतीचा जवळपास साडेचार कोटींचा कर थकीत आहेत. गावातील विकासकामांना गती यावी, यासाठी सरपंच मंगलबाई लोहकरे, जि. प. सदस्या उषा हिवाळे, पंचायत समिती सदस्य दीपक बडे, उपसरपंच मोहनीराज धनवटे, ग्रामविकास अधिकारी एस. एन. रोहकले, ग्रामपंचायत सदस्य दत्तू हिवाळे, सुभाष सोनवणे, शिवराम ठोंबरे, मीरा तौर, अशोक जाधव, कांताबाई जाधव, योगिता महालकर, संजीवनी सदावर्ते, भीमराव कीर्तीकर, नंदाताई बडे, रुक्मिणी खंदारे, कांचन कावरखे, ज्ञानेश्वर वाघचौरे, अशोक शेजूळ, जयश्री कोळेकर आदींनी जप्तीची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला होता.