औरंगाबादच्या प्रवेशद्वारावर खड्ड्यांची रांगोळी; कॅंब्रिज चौकाजवळ वाहनचालकांची कसरत, रुग्णांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 14:03 IST2021-02-02T14:00:28+5:302021-02-02T14:03:49+5:30
Aurangabad Pothole पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात मराठवाडा, विदर्भातून येणाऱ्या पर्यटकांचे शहरात प्रवेश करतात खड्ड्यांच्या रांगोळीने स्वागत होत आहे.

औरंगाबादच्या प्रवेशद्वारावर खड्ड्यांची रांगोळी; कॅंब्रिज चौकाजवळ वाहनचालकांची कसरत, रुग्णांचे हाल
- श्रीकांत पोफळे
करमाड : मराठवाड्यासह महाराष्ट्रातं यंदा पावसाने जोरदार हजेरी लावली, पावसाचेप्रमाण यावर्षी जास्त असल्याने मुख्य महामार्गासह गावखेड्यातील रस्त्याची पूर्णपणे चाळणी झाली आहे. औरंगाबाद-जालना या मुख्यमहामार्गावरही राजमाता जिजाऊ चौक कॅंब्रिज स्कूल ते चिकलठाणापर्यंत गेल्या सहा महिन्यापासून खड्डेचखड्डे पडल्याने रस्त्याची चाळणी झाली आहे. सलग ६ महिने रस्ता खराब असल्याची 10 वर्षांत पहिलीच वेळ असल्याची रोज प्रवास करणारे त्रस्त प्रवासी सांगत आहे. प्रवासी आणि रुग्णांना याचा त्रास होत असूनही संबंधित विभागाचे अधिकारी सुस्त असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात मराठवाडा, विदर्भातून येणाऱ्या पर्यटकांचे शहरात प्रवेश करतात खड्ड्यांच्या रांगोळीने स्वागत होतं आहे. महामार्गावर मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याचीमोठी दुरवस्था झाली आहे. कॅंब्रिज शाळा ते चिकलठाणा हा रस्ता धोकादायक बनला आहे. हा रस्ता शहरात येणारामुख्य रस्ता व महामार्ग असूनही याच्या दुरुस्तीकडेसंबंधित विभागाचेदुर्लक्ष होत आहे. खड्ड्यांमुळे महामार्गावर रोज छोटे मोठे अपघात होत आहेत. यामुळे जिव मुठीत धरून दोन तीन किलोमीटर अंतर पार करावे लागत असून अनेकांना अपंगत्वाला सामोरे जावे लागतं आहे. काही दिवसांपूर्वीचं खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात एका बाईकस्वाराचा अपघात होऊन जीव गमवावा लागला होता. प्रवासी, रुग्ण आणि वाहनचालक त्रस्त असूनही या मार्गाच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभाग गेल्या सहा महिन्यापासून झोपेचं सोंग घेत गप्प असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे .
जवळपास दीड किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब आहे. खड्यांमुळे प्रचंड मनस्ताप होत असून वाहनांचेही नुकसान होत आहे. वयस्कर मंडळींना मणक्याचे त्रास उद्भवत आहेत. संबंधित विभागाने थोडी शरम वाटू द्यावी व तात्काळ रस्ता दुरुस्ती करावी.
- रवी शिरसाठ, रहिवासी, सुंदरवाडी.
अपघाताच्या भीतीने कमी वेगात गाडी चालवावी लागते. त्यामुळे या मार्गावर सतत वाहनकोंडी होत आहे. यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
- बद्री शिंदे, हॉटेल चालक, झाल्टा