‘पीईएस’ सोसायटीच्या अध्यक्षपदावरून रामदास आठवले विरुद्ध आनंदराज आंबेडकर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 13:21 IST2025-01-15T13:18:57+5:302025-01-15T13:21:14+5:30
‘पीईएस’चा अध्यक्ष मीच, यापुढे माझ्या स्वाक्षरीने आर्थिक व्यवहार करा असे आठवले बोलल्यानंतर त्याला आनंदराज आंबेडकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे

‘पीईएस’ सोसायटीच्या अध्यक्षपदावरून रामदास आठवले विरुद्ध आनंदराज आंबेडकर !
छत्रपती संभाजीनगर : ‘पीईएस’चा कायदेशीर अध्यक्ष मीच आहे. यापुढे इथल्या प्राचार्यांनी माझे ऐकले पाहिजे, माझ्या स्वाक्षरीने आर्थिक व्यवहार केले पाहिजेत, अन्यथा त्यांना बदलावे लागेल, असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिला.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त आठवले शहरात आले होते. आठवले म्हणाले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी पीईएसची स्थापना केली. ही संस्था केवळ दलितांचीच राहू नये यासाठी विश्वस्तांमध्ये सात दलित आणि चार दलितेतर विश्वस्त असे एकूण ११ जण असावेत, अशी संस्थेच्या घटनेतच तरतूद केली आहे. कोणी म्हणते एस. पी. गायकवाड अध्यक्ष आहेत, तर कोणी आनंदराज आंबेडकर आहेत. मात्र, अध्यक्ष मीच आहे. न्यायालयाने अध्यक्षपदाचा माझा कायदेशीर मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे पीईएसमध्ये काम करणाऱ्या संस्थांच्या सर्व प्राचार्यांनी माझे ऐकले पाहिजे.
आठवले यांनीच पीईएसचे वाटोळे केले : आनंदराज आंबेडकर
रामदास आठवले यांनीच आंबेडकरी राजकारण आणि पीईएस सोसायटीचे वाटोळे केल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांनी केला. आठवले हे अडाणी असून त्यांना यातील काहीही कळत नसल्याची टीकाही यावेळी आंबेडकर यांनी केली. आनंदराज म्हणाले, आठवले यांना यातील काहीही कळत नाही. ते शिकले असते तर बरे झाले असते. कोणत्याही कोर्टाने आठवले यांना अध्यक्ष असल्याचे म्हटलेले नाही. तसा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाही. त्यांनी केवळ पीईएसचे नाही तर आंबेडकरी राजकारणाचे देखील वाटोळे केल्याची टीका आंबेडकर यांनी केली. त्यांना अध्यक्ष होण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांना लवकरच संस्थेतून कायदेशीररीत्या बाहेर काढू. त्यांनी वायफळ बडबड करू नये, असेही आनंदराज म्हणाले.