मराठवाड्यात कुठे पाऊस, तर कुठे ऊन; शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 17:43 IST2019-06-27T17:40:52+5:302019-06-27T17:43:53+5:30
मोठ्या पावसाची सर्वानांच प्रतीक्षा

मराठवाड्यात कुठे पाऊस, तर कुठे ऊन; शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत
औरंगाबाद : मराठवाड्यात अनेक भागात बुधवारी पावसाच्या सरी बरसल्या, तर काही जिल्ह्यात कडक ऊन पडले होते. शनिवारपासून पाऊस होत असला, तरी शेतकरी मात्र दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
परभणी जिल्ह्यातील ८ तालुक्यांमध्ये सरासरी २़७९ मिमी पाऊस झाल्याची नोंद बुधवारी सकाळी महसूल विभागाकडे झाली आहे़ सेलू तालुक्यात मात्र पाऊसच झाला नाही़
लातूर शहरात बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. १५-२० मिनिटे बरसलेल्या या पावसाने रस्त्यावर पाणी साचले होते. दरम्यान, या पावसाने शेती कामांना सुरुवात झाली असून मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.
हिंगोली शहरातील काही भागात दुपारी २ वाजता हलक्या सरी बरसल्या. तर वसमत येथे अर्धा तास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. बासंबा व कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा, नांदापूर या ठिकाणी सायंकाळी पाऊस झाला.
नांदेड शहरात बुधवारी सायंकाळी रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती़, तर मुदखेडात तासभर पाऊस झाला़
भोकरदनमध्ये मनसोक्त बरसला
बुधवारी भोकरदनसह दानापूर परिसरात सुमारे पाऊण तास संततधार पाऊस सुरू होता. दानापूर येथे घरात घुसलेले पाणी टोपल्याने काढून अन्नधान्य तसेच इतर संसार उपयोगी वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवल्या. ज्यांच्या घरात हे पावसाचे पाणी शिरले. यात माजी उपसरपंच बालाजी पवार, नामदेव दळवी, अमोल पावर, रशीद शेख , रामराव दळवी, देविदास पवार, चंद्रकांत पवार, पुसाबाई सोनुने यांचा समावेश आहे. दरम्यान, जालना शहरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अर्धा तास पावसाची रिमझिम सुरू होती.