औरंगाबाद : मोठ्या पावसाची बळीराजासह सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते, तो पाऊस आषाढाच्या पहिल्या दिवसाचा मुहूर्त काढून शहरासह जिल्ह्यात मनसोक्त बरसला अन् दुष्काळाने आक्रसलेल्या चेहऱ्यावर नवकांती आली. या वर्षाऋतुतील मंगळवारचा दिवस सोनियाचा ठरला. या पावसाने पर्यटननगरी चिंबचिंब झाली.चोहोबाजूच्या डोंगरांचे कडे ढगांनी झाकाळले गेले. कोरडे पडलेले नाले, नद्या खळखळून वाहू लागले. लहान-थोरांनी या धुवाधार पावसाचे तेवढ्याच जल्लोषात स्वागत केले... अंग ओलेचिंब झाले तरीही कोणी तोंड वाकडे नाही केले. दीर्घ काळानंतर वेरूळ लेणी परिसरातील धबधबा धो-धो वाहू लागला. दौलताबाद , अजिंठा लेणीच्या घाटावरून दिसणाऱ्या निसर्गाच्या सौंदर्याने सर्वांचे नेत्र दिपून गेले. या चिंब पावसाने जिल्हा आबादानी झाला. अशीच कृपा आम्हावरी राहू दे, अशीच प्रार्थना वरुणराजाकडे सर्वांनी केली. गंगापूर शहरात दोन तासांत ६२ मि.मी.गंगापूर : गंगापूर शहर व परिसरात मंगळवारी पावसाने सलग दोन तास हजेरी लावली. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. येथील जुने बसस्थानक परिसरातील दुकानांत पाणी शिरल्याने ऐनवेळी दुकानदारांची धावपळ उडाली. मंगळवारी दुपारी १ वाजेदरम्यान पावसाला सुरुवात झाली. सलग दोन तास संततधार पाऊस सुरू होता. गंगापूर शहरात पहिल्यांदाच जोराच्या पावसामुळे पाणी रस्त्यावर खळाळून वाहिले. न.पऊने मान्सूनपूर्व नाले सफाई न केल्यामुळे शहरात ठिकठिकाणी नाल्यावरून पाणी वाहत होते. जुने बसस्थानक परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांची फजिती झाली. येथील बहुतांश दुकानांत पाणी शिरल्याने दुकानदार दुकानाबाहेर उभे होते. ३ वाजेपर्यंत पाण्याचा जोर कमी झाला होता. याशिवाय तालुक्यातील मांजरी, हर्सूल, शिद्धनाथ वाडगाव, डोणगाव, तुर्काबाद, वाळूज, शेंदुरवादा या महसुली सर्कलमध्ये जोरदार पाऊस झाला. कन्नड तालुक्यात सर्वदूर पाऊसकन्नड : तालुक्यात सकाळी ११ वाजेपासून काही ठिकाणी हलका, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. या भिजपावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी (दि.५) दिवसभर ढगाळलेल्या वातावरणामुळे सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर काही ठिकाणी रिमझिम, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. सायंकाळी ५.३० वाजता पावसाने उघडीप दिली. या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता तात्पुरती मिटली आहे. वैजापूर तालुक्यात मुसळधार पाऊसवैजापूर : गेल्या तीन ते चार दिवसांपासून रिमझिम पडणाऱ्या पावसाने मंगळवारी पाच तासांत धो-धो बरसात केली. दिवसभर वैजापूर शहर व परिसराला चांगलेच झोडपले. पावसामुळे बाजारपेठेत ग्राहक, दुकानदारांची धावपळ उडाली. जनजीवन विस्कळीत झाले.तालुक्यात सोमवारपर्यंत ९४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झालेली आहे, तर मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाची नोंद बुधवारी सकाळी तहसील कार्यालयास प्राप्त होईल. ईदचा बाजारात, शहरातील विविध ठिकाणी रस्त्याच्या कडेला पाणी साचले होते. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना पावसापासून बचावासाठी विविध दुकानांचा आश्रय घ्यावा लागला. अनेक गल्ल्यांत गुडघ्याएवढे पाणी साचले होते. यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती.सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांची पावसामुळे धावपळ उडाली. गेल्या दोन ते तीन दिवस मधूनमधून हलक्या सरींचा पाऊस पडत होता. मात्र, आज पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात आनंदमय वातावरण पसरले आहे. वैजापूर शहरासह तालुक्यात सकाळपासूनच आभाळ काळेभोर झाले होते. तालुक्यातील काही भागांत गत महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवली होती. आज झालेल्या दमदार पावसामुळे रखडलेल्या पेरण्या आता पूर्ण होतील.शहरात पाणीच पाणीसंग्रहालयाला गळतीदिवसभराच्या पावसामुळे मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाला गळती लागली. संग्रहालयात अनेक ठिकाणी पाणी पडत होते. अंबिकानगरातील पुलावरून पाणी वाहिलेअंबिकानगरातील पुलावरून पाणी वाहत होते. या ठिकाणी संतोषीमातानगरकडे जाताना असलेल्या नाल्यावर हा पूल बांधण्यात आलेला आहे. मात्र, पुलावरून सायंकाळपर्यंत पाणी वाहत असल्यामुळे तिकडे जाणारा रस्ता बंद झाला होता.साताऱ्यात नागरिकांची दैनापावसामुळे मंगळवारी सातारा परिसरातील नागरिकांची दैना उडाली. बहुतेक रस्ते कच्चे असल्यामुळे या ठिकाणी चिखलच चिखल झाला होता. परिसरातील दिशा घरकुल, हरिप्रसादनगर, श्रीविहार, प्रथमेश नगरी, न्यू भाग्योदयनगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तसेच येथील काही घरांमध्येही पाणी शिरले. दरम्यान पावसामुळे सातारा परिसरातील अनेक वसाहतींमधील वीजपुरवठा दुपारपासूनच खंडित झाला होता. फुलंब्री : तालुक्यात मंगळवारी वरुणराजा चांगलाच मेहरबान झाला. यामुळे दिवसभर नागरिकांना सूर्यदर्शन झाले नाही. तालुक्यात सुरुवातीला रिमझिम पाऊस झाला; मात्र यानंतर सुमारे ५ तास जोरदार पाऊस सुरू होता. या पावसाने खरीप पिकाला मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे बळीराजाने आनंद व्यक्त केला आहे. फुलंब्री तालुक्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दहा वाजल्यापासून पाऊस पडण्यास सुरुवात झाली. काही वेळ रिमझिमनंतर पाच तास जोरदार पाऊस झाला. तालुक्यातील पीरबावडा, निधोना या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे, तर गणोरी परिसरात १२ वाजल्यापासून जोरदार पाऊस पडत होता. मृग नक्षत्र कोरडे गेले असले तरी आता पाऊस पडण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी सुखावला असल्याचे दिसून येते. येणाऱ्या काळात आणखी जोरदार पाऊस पडला तर धरणे, तलाव भरतील असे चित्र आहे. तालुक्यातील अनेक गावांतील केटीवेअर तुडुंब भरले होते.फुलंब्री ते खुलताबाद रस्त्यावर दोन्ही बाजूने दुकाने आहेत. या रस्त्यावर पाणी जाण्यासाठी नाल्या केल्या नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचले असून, अनेक दुकानात पाणी जाण्याची शक्यता आहे. सिल्लोड रस्त्यावर एका पुलावर पाणी साचल्याने वाहनधारकांना जाण्या-येण्यास अडचण निर्माण झाली होती. खुलताबाद : खुलताबाद तालुक्यात मंगळवारी (दि.५) जोरदार पाऊस झाला. जवळपास दोन ते अडीज तास कुठे मध्यम, तर कुठे मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे पहिल्यांदाच नदी, नाले खळखळून वाहिले. विशेष म्हणजे या पावसामुळे शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले आहे. त्यामुळे बळीराजाने समाधान व्यक्त केले आहे.मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाने विहीर, बोअरची पाणीपातळी वाढेल, असा अदांज वर्तविला जात आहे. या पावसाने तालुक्यातील फुलमस्ता, गिरिजा नद्या वाहत्या झाल्या आहेत. तालुक्यातील नदी खोलीकरण व रुंदीकरणामुळे नदी, नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तालुक्यातील म्हैसमाळ परिसरात झालेल्या जोरदार पावसाने वेरूळ लेणीचा धबधबा, येळगंगा नदी वाहू लागली आहे. तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी सांगितले की, तालुक्यात साधारण ५० ते ५५ मि.मी. पाऊस झाल्याचा अंदाज आहे. या पावसामुळे कुठलीही अनुचित घटना घडलेली नाही, असेही ते म्हणाले. पैठणमध्ये पाऊस आला मोठा...पैठण : पैठण शहरासह तालुक्यात सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. सकाळपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला प्रारंभ झाला. दुपारनंतर मात्र पावसाने जोरदार हजेरी लावली. नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक भगवान कुलकर्णी, कैलास मगरे, कार्यालयीन अधीक्षक व्यंकटी पापुलवार यांनी पथकासह जेसीबीने सखल भागात साचलेले पाणी काढून दिले. पैठण शहरासह बिडकीन, चितेगाव, जायकवाडी, पाचोड, आडूळ, ढोरकीन, बालानगर, दावरवाडी, ढाकेफळ, लोहगाव, दावरवाडी, टाकळी अंबड, नवगाव, नांदर, कौंदर, कुतूबखेडा, सालवडगाव, हार्षी, दादेगाव, नानेगाव, पुसेगाव, खेर्डा, डेरा, धनगाव, पिंपळवाडी आदी परिसरात जोरदार पाऊस झाला.
रान झालं आबादानी; जिल्ह्यात सर्वत्र दमदार
By admin | Updated: July 6, 2016 00:40 IST