परतीचा पाऊसही रुसला!
By Admin | Updated: October 3, 2014 00:32 IST2014-10-03T00:30:53+5:302014-10-03T00:32:51+5:30
उस्मानाबाद : परतीच्या पावसाच्या आशेवर असलेल्या जिल्हावासियांच्या पदरी निराशाच पडली आहे़ अल्पप्रमाणात झालेला पाऊस, पिकांवर पडणारी रोगराई, पावसाअभावी करपणारी पिके

परतीचा पाऊसही रुसला!
उस्मानाबाद : परतीच्या पावसाच्या आशेवर असलेल्या जिल्हावासियांच्या पदरी निराशाच पडली आहे़ अल्पप्रमाणात झालेला पाऊस, पिकांवर पडणारी रोगराई, पावसाअभावी करपणारी पिके आणि भविष्यातील पाणी टंचाई अशा अनेक समस्यांनी जिल्हावासिय हैराण झाले आहेत़ जिल्ह्यातील २११ प्रकल्पांपैकी केवळ २१ प्रकल्प १०० टक्के भरले असून, २५ प्रकल्प कोरडेठाक तर ५८ प्रकल्प जोत्याखाली आहेत़
गत तीन-चार वर्षापासून जिल्ह्यावर वरूणराजाची जणू वक्रदृष्टीच आहे़ सलग तीन वर्षाच्या दुष्काळी स्थितीचा सामना करणाऱ्या जिल्हावासियांना यंदाचा उन्हाळा बऱ्यापैकी गेला़ मात्र, यंदा पुन्हा पावसाने जिल्ह्याला हुलकावणी दिली आहे़ अडीच महिने उशिराने आलेला पाऊसही अपेक्षितरित्या पडला नाही़ गणेशोत्सवापूर्वीचे दहा-बारा दिवस झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाणीसाठा दिसत आहे़ त्यानंतर गायब झालेला पाऊस पुन्हा जिल्ह्यात अवतरला नाही़ परतीचा पाऊस जिल्ह्यावर चांगला बरसेल, ही आशाही आता फोल ठरली आहे़ उन्हाचा पारा ३४ अंशावर गेला असून, पहाटे, रात्रीच्या वेळी थंडीच्या प्रमाणातही वाढ झाली आहे़
प्रकल्पांची सद्यस्थिती पाहता १ मध्यम आणि २० लघू प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत़ एका मध्यम आणि ११ लघू प्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे़ १ मध्यम आणि ११ लघू प्रकल्पात ५१ ते ७५ टक्क्यांच्या दरम्यान पाणीसाठा आहे़ २ मध्यम आणि १८ लघू प्रकल्पात २६ ते ५० टक्क्याच्या दरम्यान पाणी आहे़ तर ६ मध्यम आणि ४७ लघू प्रकल्पात २५ टक्क्यांहून कमी प्रमाणात पाणी आहे़ तर एक मोठा, ४ मध्यम आणि ५३ लघू प्रकल्पातील पाणीपातळी जोत्याखाली असून, मोठ्याप्रमाणात पाणीउपसा झाल्यानंतर दीड-दोन महिन्यात हे प्रकल्प कोरडेठाक पडण्याची शक्यता आहे़ तर १ मध्यम व २४ प्रकल्प क्षेत्रात पाऊस कमी प्रमाणात झाल्याने हे प्रकल्प कोरडेठाकच आहेत़ (प्रतिनिधी)
उस्मानाबाद शहरासह ढोकी, कसबेतडवळे, तेर व येडशी या गावांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या तेरणा प्रकल्पामध्ये केवळ १२़७२ टक्के पाणीसाठा आहे़ तर रूईभर प्रकल्प जोत्याखाली, वाघोली प्रकल्पात २६़७६ टक्के, तुळजापूर तालुक्यातील कुरनूर प्रकल्प २३़८ टक्के, हरणी प्रकल्पात ४४़७० टक्के, खंडाळा प्रकल्पात २१़२४ टक्के, उमरगा तालुक्यातील जकापूर २़५४ टक्के, तुरोरी १८़८९ टक्के, तर बेन्नीतुरा मध्ये १५़७६ टक्के पाणीसाठा आहे़ कळंब तालुक्यातील रायगव्हाणही गतवर्षीप्रमाणे यंदाही कोरडाठाक पडला आहे़ भूम तालुक्यातील बाणगंगा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे़ तर रामगंगामध्ये ८९़८ टक्के, संगमेश्वर प्रकल्पात ६६़३६ टक्के पाणी आहे़ परंडा तालुक्यातील खासापुरी प्रकल्पात ५९़२८ टक्के तर चांदणी, खंडेश्वर, साकत हे प्रकल्प जोत्याखाली आहेत़
काक्रंबा : तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील साठवण तलावात सध्या मृत पाणीसाठा शिल्लक असतानाही त्या साठ्यातूनच सध्या शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरु असल्याचे दिसून येत आहे. तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा परिसरात चार महिन्याच्या काळात एकही मोठा पाऊस झाला नसल्याने या भागातील नदी, नाले, ओढे, बंधारे, तलाव सध्या कोरडे ठाक आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. काक्रंबा गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावातही सध्या केवळ मृत पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे तो साठा राखूून ठेवण्यासाठी ग्रा.पं. ने मागील तीन महिन्यात दोन वेळा ठराव घेवून तलावातून विद्युत मोटारींद्वारे सुरु असलेला पाणी उपसा बंद करण्याबाबत तुळजापूर पं. स. च्या लघु पाटबंधारे विभागाला तसेच तसेच तहसीलदारांना कळविले. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात पाणीउपसा सुरू असल्याचे दिसत आहे. याबाबत ग्रा.पं. सदस्य शाम ढेरे म्हणाले की, भविष्यात भासणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईचे नियोजन करण्यासाठी ग्रा.पं. ने दोन वेळा ठराव घेवून पाणी उपसा बंद करण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांनी स्वत:हून मोटारी बंद नाही केल्यास ग्रामपंचायतीच्या वतीने मोटारी जप्त करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.