खोट्या ITRवर देशभरात १५० ठिकाणी धाडी; धागेदोरे छत्रपती संभाजीनगरातील एका CA फर्मपर्यंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 11:56 IST2025-07-15T11:56:05+5:302025-07-15T11:56:47+5:30
आयकर विभागाने एआयच्या मदतीने संशयास्पद व्यवहार शोधले; छत्रपती संभाजीनगरातील सीए फर्म पुन्हा अडचणीत!

खोट्या ITRवर देशभरात १५० ठिकाणी धाडी; धागेदोरे छत्रपती संभाजीनगरातील एका CA फर्मपर्यंत
छत्रपती संभाजीनगर : आयकर विवरणपत्रात (ITR) खोटी वजावट आणि करसवलती दाखवून परतावा मिळवणाऱ्या व्यक्ती व संस्थांवर आयकर विभागाने सोमवारी मोठी कारवाई सुरू केली. देशभरात १५० ठिकाणी पडताळणी मोहीम राबविण्यात आली. त्याचे धागेदोरे छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचले आहेत. येथील एका सीए फर्मच्या कार्यालयासह कनिष्ठ कॉमर्स महाविद्यालयात दिवसभर कागदपत्रांची कसून तपासणी करण्यात आली.
बनावट हक्क, खोटी माहिती आणि दलालांच्या मदतीने उभारलेली रिफंड रॅकेट्स देशभरात उघडकीस आली आहेत. आयकर विभागाने मागील काही महिन्यांत मिळालेल्या डेटा, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आणि ग्राउंड इंटेलिजन्सच्या आधारे संशयास्पद व्यवहार ओळखून ही कारवाई केली. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, पंजाब आणि मध्य प्रदेशात एकूण १५० ठिकाणी छापे टाकण्यात आले. यामध्ये करचुकवेगिरी करून शासनाला चुना लावण्यात आल्याचे मोठ्या प्रमाणावर पुरावे मिळाल्याची माहिती आयकर विभागाने दिली आहे.
छत्रपती संभाजीनगरात पहाटेपासून कारवाई, पंजाब, मुंबई, नाशिकहून आले अधिकारी
छत्रपती संभाजीनगरातील एका सीए फर्मवर सोमवारी पहाटेपासूनच कारवाईला सुरुवात झाली. यासाठी पंजाब, मुंबई आणि नाशिकहून आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी रविवारी मध्यरात्री शहरात दाखल झाले होते. स्थानिक अधिकाऱ्यांना सोबत घेत पहाटे ५:३० वाजता सिडको एन-२ ठाकरेनगर येथील क्लासेस, संबंधित सीएचे निवासस्थान, सिडको एन-४ येथील ज्युनिअर कॉमर्स कॉलेज आणि हर्सूल टी-पॉइंट येथील कार्यालय अशा तिन्ही ठिकाणी एकाचवेळी छापे टाकण्यात आले. ही कारवाई पूर्णतः गोपनीय ठेवण्यात आली होती आणि ती रात्री उशिरापर्यंत सुरू होती. उल्लेखनीय म्हणजे, याच सीए फर्मवर २०१५ मध्येही आयकर विभागाने अशाच स्वरूपाची कारवाई केली होती.
बनावट दाव्यांवर कठोर कारवाईचा इशारा
आयकर विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे स्पष्ट इशारा दिला आहे की, वजावट व परतावा मिळविण्यासाठी खोटे दावे करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. त्यामध्ये आर्थिक दंड, गुन्हे नोंदविणे आणि मालमत्ता जप्तीची कार्यवाही करण्यात येईल.