छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रामाणिक भूमिका असल्याचा दावा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केला. त्यांची भूमिका आपण स्वत: मनोज जरांगे-पाटील यांना भेटून सांगणार असल्याचे, विखे-पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळ बैठकीनिमित्त ते शहरात आले होते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील का, असे विचारले असता विखे-पाटील म्हणाले की, राज्यात सध्या एकत्रीकरणाच्या मोहिमा सुरू आहेत. हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. शरद पवार यांना लोकसभेत अपघाताने यश मिळाले होते. विधानसभेत मात्र त्यांचा दारुण पराभव झाला. त्यामुळे आता बळ मिळेल, असे वाटत नाही. योजनांना निधी कमी पडत आहे, याकडे लक्ष वेधले असता मंत्री म्हणाले की, आज जरी निधी कमी पडला तर पुरवणी अर्थसंकल्पामध्ये निधी उपलब्ध होणार आहे. सामाजिक न्याय खात्याचा निधी लाडकी बहीण योजनेला वळविल्याने शिरसाट संतप्त झाले आहेत. याबाबत विखेंना बोलते केले. शिरसाट नुकतेच मंत्री झाले आहेत, त्यांना थोड कामकाज समजून घ्यायला पाहिजे, असा सल्ला त्यांनी शिरसाट यांना दिला.