महापौर, उपमहापौरपदावरून भाजपमध्ये राडा
By Admin | Updated: April 26, 2015 01:01 IST2015-04-26T00:53:05+5:302015-04-26T01:01:58+5:30
औरंगाबाद : महापौर, उपमहापौरपदावरून भाजपमध्ये मोठा अंतर्गत कलह निर्माण झाला आहे. शिवसेनेकडून त्र्यंबक तुपे यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केल्यामुळे

महापौर, उपमहापौरपदावरून भाजपमध्ये राडा
औरंगाबाद : महापौर, उपमहापौरपदावरून भाजपमध्ये मोठा अंतर्गत कलह निर्माण झाला आहे. शिवसेनेकडून त्र्यंबक तुपे यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केल्यामुळे भाजपकडून राजू शिंदे यांनी आज सायंकाळी अर्ज दाखल केला.
निवडणुकीत भाजपच्या मानगुटीवर बसून सेनेने जास्त जागा हिसकावल्या. सेनेने २० वर्षांत भाजपला महापौरपदाची संधी तीन वेळेस दिली आहे. त्यामुळे यावेळी पहिले महापौरपद भाजपने मागितले आहे.
महापौरपद वाटाघाटीसाठी युतीची मुंबईतील बैठक निष्फळ ठरल्यामुळे शिंदे यांनी अर्ज दाखल केला आहे, तर दुसरीकडे दोन महिन्यांपूर्वी काँगे्रसमधून भाजपमध्ये आलेले प्रमोद राठोड यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केल्यामुळे मूळ भाजप नगरसेवकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भाजपला पहिले महापौरपद हवे आहे; परंतु सेना ते देण्यासाठी तयार नाही. २००५ साली सव्वा-सव्वा वर्षे पद वाटून घेण्यात आले होते. त्याच फॉर्म्युल्यावर पदवाटप व्हावे, अशी भाजपची मागणी आहे; परंतु त्यासाठीदेखील सेना तयार नाही. शनिवारी सायंकाळी ५.४५ ही अर्ज भरण्याची शेवटची वेळ होती. तोपर्यंत भाजप कार्यालयाकडून काहीही आदेश आलेले नव्हते. तुपे यांनी अर्ज भरल्यानंतर उपमहापौरपदासाठी कुणाला संधी द्यायची यावरून भाजपमध्ये खल सुरूझाला.
उपमहापौरपदासाठी नगरसेवक नितीन चित्ते यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाले होते. त्यांना सकाळी ११ वा. मनपात अर्ज घेण्यासाठी पाठविण्यात आले. उपमहापौरांच्या दालनातच ते बसून होते. अर्ज भरण्याची वेळ जवळ येत होती; परंतु त्यांना काहीही सूचना नव्हत्या.
४भाजप पदाधिकारी, नेत्यांचा खल उपमहापौर दालनातून केणेकर यांच्या दालनात गेला. तेथेही काही निर्णय झाला नाही. संतप्त चित्ते आणि संजय केणेकर यांच्यात प्रसाधनगृहात अर्ज भरण्यावरून चर्चा झाली. दरम्यानच्या काळात प्रमोद राठोड यांनी अर्ज भरला.
भाजपच्या विश्वासघातामुळे सकाळपासून ताटकळत बसलेले चित्ते यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. त्यानंतर पक्षाने त्यांना अर्ज भरण्यास सांगितला. ते सचिवांच्या दालनापर्यंत गेले आणि पुन्हा त्यांना फोन करून माघारी बोलावले. शहराध्यक्ष भगवान घडमोडे यांनी त्यांना गाडीतून पालिकेबाहेर नेले. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जालना रोडवरील एका हॉटेलात सुरू झाली.