आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उत्तरे पुरविणारे रॅकेट उद्‌ध्वस्त; सात जण अटकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 12:35 PM2021-03-01T12:35:05+5:302021-03-01T12:44:46+5:30

Racket exposed in health department exams in Aurangabad खोकडपुरा परिसरातील एका अभ्यासिकेतून लॅपटॉप, प्रिंटर, मोबाइल, प्रश्नपत्रिकेसह सात जण ताब्यात

Racket exposed for providing answers for health department exams; Seven arrested in Aurangabad | आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उत्तरे पुरविणारे रॅकेट उद्‌ध्वस्त; सात जण अटकेत 

आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उत्तरे पुरविणारे रॅकेट उद्‌ध्वस्त; सात जण अटकेत 

googlenewsNext
ठळक मुद्देरविवारी सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ५ वाजता दोन सत्रांत आरोग्य विभागाची परीक्षा होती.पोलिसांनी परीक्षा केंद्रावरुन फेक परीक्षार्थी आणि अन्य एकाला ताब्यात घेतले खोकडपुरा येथे ‘एमएमसी मार्केट’ येथील गजानन अभ्यासिकेतून हे रॅकेट चालत होते

औरंगाबाद : आरोग्य विभागाच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना मोबाइलवरून उत्तरे पुरविणारी कंट्रोल रूम चिकलठाणा पोलिसांनी प्रसंगावधान राखून वेळीच उद्‌ध्वस्त केली. खोकडपुरा परिसरातील एका अभ्यासिकेतून उत्तरे पुरविणाऱ्या या रॅकेटमधील दोघांना, तर गेवराई तांडा येथील एका परीक्षा केंद्रातून दोघांना तर अभ्यासिकेतून पळून जाणारे तिघे असे सात जण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही धाडसी कारवाई रविवारी सकाळी ११ वाजता यशस्वी करण्यात आली.

रविवारी सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ५ वाजता दोन सत्रांत आरोग्य विभागाची परीक्षा होती. या परीक्षेविषयी आरोग्य विभागाने बरीच गोपनीयता पाळण्याचा प्रयत्न केला असला, तरीही या परीक्षेचा पेपर अखेर फुटलाच. औरंगाबाद तालुक्यातील गेवराई तांडा येथे धनेश्वरी कृषी महाविद्यालयात असलेल्या परीक्षा केंद्रात एकाच्या नावावर दुसरा विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांना दोन दिवस अगोदरच मिळाली होती. त्यानुसार चिकलठाणा पोलिसांचे पथक त्या विद्यार्थ्याला पकडण्याच्या तयारीत परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारात पाळत ठेवून होते. साध्या गणवेशात असलेल्या पोलिसांनी रविवारी सकाळी १० वाजता परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या मदन धरमसिंग बहुरे (२४, रा. जोडवाडी) या विद्यार्थ्यास महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारातच पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कानात हेडफोन डिव्हाइस आढळून आले. त्याच्याकडे अधिक माहिती विचारली असता त्याने उत्तरे सांगण्यासाठी थांबलेल्या तरुणाचे नाव सांगितले. पोलिसांनी लागलीच त्या तरुणालाही ताब्यात घेतले व त्याच्याजवळील कंट्रोल रूममधून उत्तरांची माहिती संकलित करणारे डिव्हाइस जप्त केले.

पोलिसांनी वेळ न दवडता परीक्षेत उत्तरे सांगणाऱ्या रॅकेटविषयी या तरुणांकडून माहिती जाणून घेतली. तेव्हा खोकडपुरा येथे ‘एमएमसी मार्केट’ या नावाच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावर गजानन अभ्यासिकेतून हे रॅकेट चालत असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी लगेच खोकडपुरा येथे धाव घेतली. तेव्हा अभ्यासिकेला बाहेरून कुलूप लावलेले दिसले. पोलिसांनी कुलूप तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आत बसलेल्या तरुणांपैकी पाच जण खिडकीतून व्हेंटिलेशनसाठी असलेल्या डक्टमध्ये उड्या मारून पळून जाण्यात यशस्वी झाले. आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की, डक्टला असलेल्या लोखंडी सळाया लागून हे सारे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. पळून जाणाऱ्या तरुणांना लोकांनी काय झाले म्हणून विचारले असता, त्यांनी भांडण झाले असल्याचे सांगून तेथून पळ काढला. अभ्यासिकेत नेहमीच भांडण होत असल्यामुळे लोकांनीही त्याकडे दुर्लक्ष केले.

सात जण अटकेत
पोलिसांनी गेवराई तांडा येथील धनेश्वरी कृषी महाविद्यालय या परीक्षा केंद्राबाहेरुन पोलिसांनी मदन बहुरे व राहुल बहुरे या दोन तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांचे पथक खोकडपुरा येथे गेले. तेथे एमएमसी मार्केट इमारतीतील गजानन अभ्यासिकेतून फूलबेग गुलाबबेग (३०, रा. बदनापूर) व रमेश बमनावत या दोन तरुणांना रंगेहात पकडले. त्यानंतर सायंकाळी अभ्यासिकेतून पळून गेलेल्या तरुणांपैकी तिघा जणांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. याप्रकरणात दिवसभरात सात आरोपींना अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणात आणखी काही जणांना ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अभ्यासिकेचा मालक संशयाच्या भोवऱ्यात
खोकडपुरा येथील एमएमसी मार्केट इमारतीत पहिल्या मजल्यावर स्वप्निल बाहेकर हे गजानन अभ्यासिका चालवितात. बाहेकरने वर्षभरापूर्वीच या इमारतीत अभ्यासिकेसाठी दोन रुम भाडेतत्त्वावर घेतल्या असून गेल्याच महिन्यात पुढील वर्षाचा नवीन भाडेकरार केला होता. ते सध्या नाशिक येथे क्वारंटाईन असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. रविवारी अभ्यासिकेचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी ती बंद ठेवली जाणार असल्याचा निरोप त्याने शनिवारी विद्यार्थ्यांना दिला होता. त्यामुळे अभ्यासासाठी नियमित येणारी मुले रविवारी तिकडे फिरकलीच नाहीत. त्यामुळे बाहेकर हे सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पोलिसांनी कुलूप तोडून अभ्यासिकेत सुरू असलेला या गैरप्रकार हाणून पाडला. तेथे दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर अभ्यासिकेतून एक लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर मशीन, मोबाईल, स्कॅन केलेली प्रश्नपत्रिका जप्त केली.

उत्तरे पुरविण्याची प्रक्रिया अशी चालायची
या रॅकेटमार्फत परीक्षार्थीला हेडफोन व सीमकार्ड असलेले मास्टर कार्ड नावाचे इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस दिले जाते. हा डिव्हाईस खिशाला चौकोनी छिद्र करून ते आत ठेवायचे. परीक्षार्थीला प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर त्याने डिव्हाईससमोर प्रश्नपत्रिका धरली की ते आपोआप फोटो काढते व बाहेर थांबलेल्या व्यक्तीच्या मोबाईलवर पाठवते. बाहेर थांबलेल्या व्यक्तीने मोबाईलवर आलेली प्रश्नपत्रिका खोकडपुरा येथील कंट्रोलरूममध्ये बसलेल्या व्यक्तींच्या मोबाईलवर पाठवायची. मग तेथे बसलेल्या तरुणांनी उत्तरे शोधून लगेच संबंधितांना मोबाईलवरून सांगायची, अशी प्रक्रिया चालायची.

एका प्ररीक्षार्थीसोबत १० ते १५ लाखांचा व्यवहार
उत्तरे पुरविण्यासाठी प्रती प्रशिक्षणार्थीसोबत या रॅकेटने १० ते १५ लाख रुपयांचा व्यवहार केलेला आहे. मदन जारवाल या तरुणास परीक्षा केंद्राबाहेरच पकडण्यात आले. मग, खोकडपुऱ्यातील कंट्राेलरूमध्ये पोलिसांनी प्रश्नपत्रिका जप्त केली ती कोठून आली, असा प्रश्न उपस्थित झाला असून, या रॅकेटच्या गळाला अनेक विद्यार्थी अडकले असावेत, असा पोलिसांचा कयास आहे. कोणकोणत्या जिल्ह्यात या रॅकेटचे कनेक्शन होते व यात आणखी किती जणांचा सहभाग आहे, त्याचा शोध चिकलठाणा पोलीस घेत आहेत.

Web Title: Racket exposed for providing answers for health department exams; Seven arrested in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.