स्मार्ट कार्डमधून ‘आरसी’ देणे ठप्प
By Admin | Updated: November 30, 2014 00:59 IST2014-11-30T00:19:34+5:302014-11-30T00:59:53+5:30
औरंगाबाद : वाहन खरेदीनंतर स्मार्ट कार्डमधून वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) तयार करणाऱ्या कंपनीचा प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी (आरटीओ) असलेला करार संपला आहे.

स्मार्ट कार्डमधून ‘आरसी’ देणे ठप्प
औरंगाबाद : वाहन खरेदीनंतर स्मार्ट कार्डमधून वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) तयार करणाऱ्या कंपनीचा प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी (आरटीओ) असलेला करार संपला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून कार्यालयात आरसी तयार करण्याचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे आता नवीन करार होईपर्यंत सोमवारपासून जुन्या पद्धतीप्रमाणे कागदी स्वरूपातील आरसी देण्याची तयारी आरटीओ कार्यालयाने केली आहे.
देशभरातील वाहनांसंबंधी माहिती सेंट्रलाईज सर्व्हरच्या माध्यमातून कोणत्याही आरटीओ कार्यालयाला हवे तेव्हा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आरटीओ कार्यालयात कागदी स्वरूपातील आरसी बुकऐवजी स्मार्ट कार्ड देण्यास सुरुवात करण्यात आली. यासाठी स्मार्ट कार्डच्या वितरणाचे कंत्राट देण्यात आले होते.
हे कंत्राट संपल्याने गेल्या तीन दिवसांपासून आरसी तयार करण्याचे काम थांबले आहे. परिणामी, वाहन नोंदणीसाठी आलेल्या फायली मोठ्या प्रमाणात पडून आहेत. शिवाय, आरटीओ कार्यालयात वाहन पासिंग, फिटनेस, आरसी बुक इ. कामांसाठी आलेल्या वाहनधारकांना सोमवारी येण्याचे सांगण्यात आले. स्मार्ट कार्डच्या वितरणाचे कंत्राट संपल्यांनंतर आरटीओ कार्यालयात सॉफ्टवेअर सुधारीकरणाचे काम हाती घेण्यात आले. यामुळे कार्यालयात लायसेन्स वगळता अन्य कामे बंद असल्याचे आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नवीन करार होईपर्यंत सोमवारपासून जुन्या पद्धतीनुसार कागदी आरसी देण्यात येणार आहे.