गुणनियंत्रण मंडळाच्या कर्मचाऱ्यांना राहवेना; कार्यालयीन वेळेत २ दिवस आधीच साजरी केली 'गटारी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 19:26 IST2025-07-25T19:26:17+5:302025-07-25T19:26:37+5:30
या पार्टीची सिंचनभवनमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

गुणनियंत्रण मंडळाच्या कर्मचाऱ्यांना राहवेना; कार्यालयीन वेळेत २ दिवस आधीच साजरी केली 'गटारी'
छत्रपती संभाजीनगर : श्रावण महिन्याच्या आदल्या दिवशी गटारी अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी होते. सिंचनभवन येथील गुणनियंत्रण मंडळ कार्यालयातील सहा कर्मचाऱ्यांनी एकत्र येत बीड बायपासवरील एका हॉटेलवर कार्यालयीन वेळेत दोन दिवस आधीच गटारी साजरी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली.
या पार्टीची सिंचनभवनमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. जालना रोडवरील सिंचन भवनमध्ये जलसंपदा विभागाचे गुणनियंत्रण अधीक्षक कार्यालय आहे. या कार्यालयांतर्गत मराठवाड्यातील ८ आणि उत्तर महाराष्ट्रातील ५ अशा एकूण १३ जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र आहे. कार्यालयप्रमुख असलेले अधीक्षक अभियंता विकास पाटील हे कामांची तपासणी करण्यासाठी सतत दौऱ्यावर असतात. शिवाय कार्यालयातील बायोमेट्रिक हजेरी यंत्रेही बंद करून तेथे जुन्या रजिस्टरवर कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदविली जाते. अशा या कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांची २८ मंजूर पदे असली असून प्रत्यक्षात १८ पदे भरलेली आहेत. उपअभियंता, कार्यालयीन अधीक्षक, प्रथम लिपीक, वरिष्ठ लिपीक, आरेखक, उच्च श्रेणी लघुलेखक आणि शिपाई आदी पदावरील कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.
या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मंगळवारी दुपारनंतर कार्यालयीन वेळेत बीड बायपासवरील एका हॉटेलवर जाऊन पार्टी केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, या पार्टीसाठी मोजकेच सहा कर्मचारी उपस्थित होते. दुपारच्या जेवणाच्या सुटीनंतर ही सर्व मंडळी कार्यालयप्रमुखांची परवानगी न घेता कार्यालयातून बाहेर पडले आणि पार्टीला गेल्याचे सूत्रांनी सांगितले. दोन तास झाले तरी कार्यालयाबाहेर पडलेले कर्मचारी न परतल्याने एका अधिकाऱ्याने हजेरी रजिस्टर ताब्यात घेतले. शिवाय दुसऱ्या दिवशी त्यांना तोंडी समज दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
याबाबत गुणनियंत्रण मंडळाचे अधीक्षक अभियंता विकास पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, याविषयी मला माहिती नाही. माहिती घेतो. तसेच असे होत असेल तर कर्मचाऱ्यांंच्या वर्तनात सुधारणा केली जाईल.